पुणे : कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे (सीओईपी) आणि भाऊज इंटरप्रेन्युअरशीप सेलच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्या ‘पुणे स्टार्टअप फ़ेस्ट’चे आयोजन केले आहे. उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजिला जाणारा ‘पुणे स्टार्टअप फेस्ट’ पुण्यातील एक मोठा महोत्सव आहे. या प्रदर्शनातून नवोदित उद्योजकांना आणि स्टार्टअपला गुंतवणूकदार, मार्गदर्शक आणि सर्वसामान्यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्यासाठी व्यासपीठ देते. केंद्र सरकारच्या स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल यासह पॉलिकॅब, बँक ऑफ महाराष्ट्र आणि फिनआयक्यू या संस्थांचे सहकार्य लाभले आहे.
‘सीओईपी’मध्ये ‘पुणे स्टार्टअप फेस्ट’चे आयोजन
गेल्या वर्षी पहिल्या ‘पुणे स्टार्टअप फेस्ट’ला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘सीओईपी’च्या विद्यार्थ्यांनी यंदा १५ आणि १६ फेब्रुवारी २०२० रोजी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. ’डिस्कव्हरिंग द नोन अननोनज’ या अनोख्या संकल्पनेवर यंदाचा महोत्सव अधारीत आहे. सर्व स्टार्टअप्सना एकाच छताखाली आणणाऱ्या या महोत्सवात १३० पेक्षा अधिक स्टार्टअप आहेत. तांत्रिक, विद्यार्थी, सामाजिक, शेतीविषयक, आरोग्य व जीवनशैली, सहकारी-कार्यस्थाने, इनक्यूबेटर झोन आणि इनोव्हेशन झोन अशा सात विभागांमध्ये स्टार्टअप्स पाहायला मिळणार आहेत. यासह दोन दिवस उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना ऐकण्याची संधी या महोत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.
मल्टिप्लाय व्हेंचरचे संस्थापक पेटीएम मॉल आणि पेटीएमचे माजी संचालक भूषण पाटील, व्हॅन समूहाचे संस्थापक आणि ओलाचे ज्येष्ठ सल्लागार श्रीनिवास चुंडूरु व पेट्रोनास ल्युब्रिकंट्स इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणव भणगे मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील. १०० पेक्षा जास्त गुंतवणूकदार व मार्गदर्शक येथे येणाऱ्या विविध लघु-उद्योगांमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संध्या उपलब्ध करून देतील. विद्यार्थ्यांना तसेच स्टार्टअप्सना उद्योजकतेविषयी चर्चेची संधी देण्यासाठी दोन दिवसांत दोन चर्चासत्रे आयोजित केले जातील. उपस्थित विद्यार्थ्यांना इंटर्नशिप घेण्याची संधी मिळते आणि विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. संगणक तंत्रज्ञान, व्यवसाय व्यवस्थापन, विपणन आणि यासारख्या वेगवेगळ्या डोमेनमध्ये काम करण्याचा विद्यार्थ्यांना अनुभव मिळतो. विद्यार्थ्यांना ४०० हून अधिक इंटर्नशिपच्या संधी मिळतील. स्टार्टअप्स तसेच विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्ने साकार करण्यासाठी व्यासपीठ दिले गेले आहे.