पुणे : “दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रामाणिक उद्देश आणि कामात चिकाटी असेल, तर यशापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे आपण आपल्या कामावर अधिक भर दिला पाहिजे. राजकारण, समाजकारण करताना पदापेक्षा कामाशी एकनिष्ठ राहून समाजाच्या हिताला प्राधान्य दिले, तर समाज आपल्याला मानसन्मान देतो. शिवाय आपल्या कामामुळे समाजातील अनेकांच्या चेहऱ्यावरचे समाधान आनंद देऊन जाते,” असे मत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.
निरंजन सेवाभावी संस्था, मातृभूमी प्रतिष्ठान आणि उचित माध्यम या संस्थांच्या वतीने पुणे महापालिका नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला. टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृहनेते धीरज घाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह महेश करपे, कर्नल महादेव घुगे, संयोजक प्रा. सचिन जायभाये, निरंजन सेवाभावी संस्थेचे जयेश कासट, विजय जाधव, संदीप साळवे आदी उपस्थित होते.
प्रवीण दरेकर म्हणाले, “पालिकेतील या चारही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून शहराचा विकास गतीने होईल. पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा उपयोग शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी केला पाहिजे. पदे ही क्षणिक असतात, पण आपले काम चिरंतर राहिले पाहिजे. विधानपरिषदेत ऊसतोडणी कामगार, माथाडी कामगार आदी वंचित घटकांचे प्रश्न मांडणार असून, ते तडीस नेण्याचा प्रयत्न करणार आहे.” मुरलीधर मोहोळ म्हणाले, “सामाजिक संस्थांनी केलेल्या या सत्कारामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. येत्या काळात पुण्याच्या विकासासाठी आम्ही सगळे जोमाने काम करू. मेट्रोसह इतर अनेक प्रकल्प लवकरच मार्गी लागतील.”
प्रास्ताविकात प्रा. सचिन जायभाये म्हणाले, “सामाजिक जाणिवेतून ज्यांनी आजवर अनेकांना घडण्यासाठी मदत केली. त्यांचा सत्कार करण्याच्या उद्देशाने या पदाधिकाऱ्यांना सन्मानित केले. भविष्यातही मदतीचे हे हात समाजाच्या सर्व घटकांसाठी पुढे राहावेत.” महेश करपे, सरस्वतीताई शेंडगे, धीरज घाटे, हेमंत रासने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. जयेश कासट यांनी स्वागत केले. जीवराज चोले यांनी सूत्रसंचालन केले.