स्मार्ट सिटी संकल्पनेवर ‘सूर्यदत्ता’तर्फे ‘ऑरा २०१९’ प्रदर्शन
हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, ‘स्मार्टसिटी’च्या सीईओ रुबल अग्रवाल यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन
पुणे : सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन संचालित पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लायड टेक्नॉलॉजी (पीआयएटी) महाविद्यालयाच्या वतीने स्मार्ट सिटी संकल्पनेवर ‘ऑरा २०१९’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. दि. २८ ते ३० डिसेंबर २०१९ या कालावधीत सदाशिव पेठेतील टिळक रस्त्यावरील अभिनव कला महाविद्यालयाशेजारील निखिल प्राईड बिल्डिंगमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत पुणेकरांना हे प्रदर्शन विनामूल्य पाहता येणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (दि. २८) सकाळी १०.०० वाजता स्मार्ट सिटी पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या उपस्थितीत होणार आहे. यंदा हे प्रदर्शन ‘स्मार्ट सिटी’ संकल्पनेवर आधारित असणार आहे. ‘पीआयएटी’चे विद्यार्थी गृह सजावटीसाठी वापरल्या जाणार्या वेगवेगळ्या ट्रेंडी, नाविन्यपूर्ण आणि वैकल्पिक साहित्यांतून कलाकृती साकारतात. प्रदर्शनाचे हे १४ वे वर्ष असून, आजवर विद्यार्थ्यांनी एकत्रित कुटुंब, जागतिक सात आश्चर्य, अजिंठा लेणी, रेल्वे स्टेशन, पाण्याखालील जीवन, तिबेटियन संस्कृती आदी संकल्पनांवर हे प्रदर्शन भरविले आहे, अशी माहिती सूर्यदत्ताच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी दिली.
‘पीआयएटी’च्या विदयार्थ्यांनी आतापर्यन्त फ्लॅट, बंगले, रचनांसाठी आवश्यक असलेले नियोजन, डिझाइनिंग, कार्यालये, बँका, रेस्टॉरंट्स, आयटी, बीपीओ आदींसाठी कॉर्पोरेट इंटिरियर डिजाइन्स तयार केले आहेत. त्यामुळे प्रदर्शनला भेट देणाऱ्या व्यक्तींकडून त्याचे कौतुक केले जाते. स्मार्ट सिटीवर आधारित या प्रदर्शनामध्ये शहर प्रशासन, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, तंत्रज्ञान, कला याद्वारे शहराचे सुशोभिकरण, प्लास्टिकमुक्त शहर अशा गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असून, अधिकाधिक पुणेकरांनी याला भेट द्यावी, असे आवाहनही सुषमा चोरडिया यांनी केले आहे.