‘शेतकऱ्यालासुद्धा इज्जत आहे’ व्हिडिओला लाखो प्रेक्षकांची पसंती
‘रानवाट प्रोड्युकॅशन्स’ निर्मित ऑस्करवाडी मराठी वेबसिरीजमधून उलगडतेय शेतकरी, ग्रामीण जीवन
पुणे : रानवाट प्रॉडक्शन्स निर्मित ‘शेतकऱ्यालासुद्धा इज्जत आहे’ या व्हिडिओला देशभरातून लाखो प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. सोशल मीडियावर तरुणाईकडून हा व्हिडीओ शेयर केला जात आहे. जवळपास ७० लाख लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे. ग्रामीण जीवन, तेथील समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, त्याचे निराकरण आणि इतर ग्रामीण भागातील किस्से-कथा मनोरंजकपणे मांडण्यासाठी सुरु झालेल्या ‘ऑस्करवाडी’ या मराठी वेबसीरीजमधील हा भाग असून, तो नुकताच ६ डिसेंबरला प्रदर्शित झाला. अवघ्या आठवड्याभरात या व्हिडिओला लाखो प्रेक्षकांनी पहिले आहे. अवकाळी, दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी पिचला जात असताना, त्याने केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून आपण त्याला सन्मानाने वागवायला हवे, असा संदेश या व्हिडिओतून दिला आहे.
‘ऑस्करवाडी’ ही मराठी वेबसिरीज पुरंदर तालुक्यातील भिवरी या गावातील तरुणांनी बनवली असून, रानवाट प्रॉडक्शनची निर्मिती, तर येवले अमृततुल्य याची प्रस्तुती करत आहे. इंटरनेटचा झपाट्याने वाढत असलेला वापर आणि सोशल मीडिया वापरणाऱ्यांची वाढती संख्या यातून अनेकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत आहे. ‘युट्युब’चा आधार घेत अनेकजण आपली कला जगाच्या कानाकोपऱयात पोहचविण्याचा प्रयत्न करत आहेत. सामाजिक विषयांवर वेबसिरीजच्या माध्यमातून प्रकाश टाकत आहेत. ‘ऑस्करवाडी’चे आजवर ६४ भाग प्रसारित झाले आहेत. जवळपास ७५ देशांतून प्रेक्षकवर्ग याच्याशी जोडलेला आहे. अतिशय साधेपणाने आणि नैसर्गिक पद्धतीने सर्व भागाचे चित्रीकरण पुरंदर तालुक्यात केले जात आहे.
या वेबसिरीजचे लेखक आणि दिग्दर्शक अक्षय कटके, संवाद लेखक परेश मरकड, छायाचित्रण आणि संकलन मंगेश टाकले, प्रोड्युकॅशन्स हेड आणि डिजिटल मार्केटिंग शुभम कोरडे आहेत. भिवरी गावातील अनेक नागरिकांनीही या टीमचे कौतुक केले असून, त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. संदीप कटके यांच्यासह इतर अनेक तरुण मंडळी या ऑस्करवाडीच्या टीमला पाठबळ देत आहेत. ऑस्करवाडीच्या टीमने ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संदीप कटके, निर्माता विठ्ठल कटके, दिग्दर्शक अक्षय कटके, कलाकार कुंडलिक घिसरे, प्रियांका पालकर, पूजा वाल्हेकर, सायली कामठे, शुभम कोरडे, कादंबरी होले, संदीप गायकवाड, वैभव भोसले, ऐश्वर्या दासले आदी उपस्थित होते.
—————————-
‘शेतकऱ्याला सुद्धा इज्जत आहे’
वेबसिरीजच्या या भागात एक श्रीमंत व्यक्ती शेतकऱयांच्या मालाची किंमत करताना दिसतो. त्याला शेतकऱयांची मुलगी योग्य भाषेत उत्तर देते. सोन्याच्या दुकानात कधीच तुम्ही किंमत कमी करत नाही. आहे त्या किमतीला सोने विकत घेता. परंतु शेतकऱयांचा मालाला नेहमी कमी किंमत करून मागितली जाते. असा दुजाभाव चालणार नाही. सोन्याने तुमचे पोट भरणार नाही. पण शेतकऱयाने उत्पादन बंद केले, तर काय होईल विचार करा. असा मार्मिक संदेश यातून देण्यात आला आहे. त्यामुळे हा भाग सध्या कांद्याच्या वाढलेल्या किमतीने बोलणाऱ्या व्यक्तींना एक प्रकारे चपराक देणारा आहे.
—————
आज पर्यंत केलेल्या प्रसारित भागातील हा भाग एकदम मनाला चटका देऊन गेला. खरेच खूप भारी आहे तुमची ऑस्करवाडी टीम. तुमच्या टीमकडून शेतकऱ्याला हमीभाव मिळावा, यासाठी हा भाग शासनाच्या डोळ्यात अंजन घालण्याइतका छान आहे. शेतकरी आणि ग्रामीण जीवनावर अनेक विषय तुम्ही हाताळावेत.
– विकास लवटे, यूट्यूब वापरकर्ता