पुणे : अगरवाल क्लब चॅरिटेबल ट्रस्ट आणि आर. एम. धारिवाल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक्स व हॅन्ड सर्जरी शिबिर आयोजिले आहे. हे अकरावे शिबीर आहे. दि. २८ व २९ डिसेंबर २०१९ या दोन दिवशी शिरूर येथील मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटल येथे हे शिबीर होणार आहे, अशी माहिती प्रसिद्ध हॅन्ड सर्जन डॉ. पंकज जिंदल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष गिरीश खेतान, प्रकल्प संचालक उमेश जालान, राजीव अगरवाल, आर. एम. धारिवाल फाउंडेशनचे उमेश मोहोड आदी उपस्थित होते.
डॉ. पंकज जिंदल म्हणाले, “भाजल्यामुळे झालेल्या जखमा, जन्मतः असलेले हाताचे, पायाचे किंवा शरीराचे व्यंग, वाकडी बोटे, मस, चेहऱ्यावरील वाकडे व्रण, मुरुमांमुळे झालेले खड्डे, दुभंगलेले ओठ, वाकडे नाक आदी गोष्टींवर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे. स्त्री व मुलींना प्राधान्य देण्यात येणार असून, गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. या सगळ्या शस्त्रक्रिया संपूर्णपणे मोफत असणार आहेत.”
डॉ. पंकज जिंदल म्हणाले, “देशात ७० लाख लोकांना भाजल्यामुळे मोठ्या जखमा झाल्या आहेत. जेणेकरुन त्यांना दैनंदिन काम करणेही शक्य होत नाही. अशा लोकांवर उपचार करुन त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. अनुभवी सर्जनकडून या शस्त्रक्रिया केल्या जात आहे. या शस्त्रक्रियांमुळे जीवन बदलून गेले आहे. पुढील काही वर्षात या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. गावांमध्येही अनेक लोक अशा शस्त्रक्रियांपासून वंचित आहेत.”
उमेश जालान म्हणाले, “डॉ. पंकज जिंदल यांनी आपल्या अनुभवी टीमसह सामाजिक भावनेतून हजारो रुग्णांवर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करुन त्यांना नवी ओळख दिली आहे. गेल्या दहा शिबिरांच्या माध्यमातून शेकडो रुग्ण पुन्हा नव्याने सुरळीत आयुष्य जगू लागले आहेत. त्यामुळे या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा. शिबीराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व गरजू व्यक्तींनी २६ डिसेंबर २०१९ पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ७५८८१४८८०५, ७०६६०२८११३, ९०११००७६६९ किंवा ०२१३८-२२५५९९, २२४५९९ या क्रमांकावर संपर्क साधावा.”