पुणे : २६ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्या देशाला स्वतःचे संविधान मिळाले होते. या दिवसाचे औचित्य साधून संविधान सन्मान समिती पुणे, सम्यक ट्रस्ट पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समिती पुणे आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २६ नोव्हेंबर ते १४ एप्रिल २०२० पर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये संविधान साक्षरता स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी संविधान मार्गदर्शन शिबीर, संविधानाच्या प्रतींचे विद्यार्थ्यांना वाटप, विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये आणि शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप, संविधानावरील परिसंवादाचे आयोजन इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या उपक्रमाची सुरुवात येत्या २६ नोव्हेंबर २०१९ रोजी ‘संविधान दिनी’ सकाळी १०.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून करण्यात येईल. सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. जेष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. मनोहर जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक विभागप्रमुख डॉ. धनंजय लोखंडे हे परिसंवादात बोलणार आहेत. जेष्ठ पत्रकार, संपादक व साहित्यिक अरुण खोरे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत, असे संयोजकांनी केले आहे.