‘एन्थुजिया’च्या सर्वसाधारण विजेतेपदावर ‘सिम्बायोसिस’ची मोहोर
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटतर्फे दोन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन महोत्सव
पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटतर्फे (अंडर ग्रॅज्युएट) आयोजित दोन दिवसीय ‘एन्थुजिया’ महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद सिम्बायोसिस महाविद्यालयाने पटकावले. विजेत्या महाविद्यालयाला सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक व सहभागी विद्यार्थ्यांना पदके देऊन गौरविण्यात आले. पुण्यातील एकूण ४० महाविद्यालयांनी महोत्सवात सहभाग घेतला. गायन, वादन, नृत्य या कलांच्या बहारदार सादरीकरणासोबतच बुद्धीला चालना देणाऱ्या विविध स्पर्धांनी ‘एन्थुजिया २०१९’ महोत्सवात रंगत आणली. एमआयटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात झालेल्या या महोत्सवात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. नृत्य, संगीत, बौद्धिक, व्यवस्थापन, सांस्कृतिक, बॉक्स क्रीडा, स्कॅव्हेंजर हंट, ट्रेजर हंट, कुकिंग, वादविवाद स्पर्धा, सोलो डान्स, ग्रुप डान्स, सोलो सिंगिंग, टग ऑफ वॉर अश्या एकूण १८ प्रकारचा समावेश असतो. यंदा पुण्यातील ४० महाविद्यालयांच्या एकूण ७५० विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभाग घेतला.
‘एन्थुझिया’ महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला एमआयटीचे कार्यकारी संचालक प्रा. राहुल कराड, प्र-कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, अधिष्ठाता डॉ. कल्याण स्वरुप, सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अंजली साने, बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक महाव्यवस्थापक सुनील कुमार बन्सल, सुनील देव, ‘एन्थुझिया’ समन्वयिका आणि बीबीए इव्हेंट मॅनेजमेंट विभागाच्या प्रमुख प्रा. पल्लवी आद्य, विभागप्रमुख प्रा. सुमिता जोशी, विभागप्रमुख प्रा. हेमंत भिसे, सहसमन्वयिका प्रा मृदुल वैद्य, विद्यार्थी समन्वयक सोहम लांडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
राहुल कराड म्हणाले, ”एन्थुजिया महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. अभ्यासासोबत विविध कला आत्मसात करणे आवश्यक आहे. संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी विविध क्षमतांचा विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.” डॉ. रवीकुमार चिटणीस म्हणाले, “कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आपल्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या हेतूने गेल्या आठ वर्षांपासून ‘एन्थुझिया’ महोत्सव वर्षातून दोनदा आयोजिला जातो.”