सप्तचक्र योगसाधनेमुळे स्थैर्य, आत्मविश्वास व यशप्राप्ती
नीता सिंघल यांचे प्रतिपादन; ‘सप्तचक्र योग साधना-यु आर मोअर’वर मोफत कार्यशाळा
पुणे : “आपल्या शरीरातील सात चक्र आपल्या आयुष्याला कलाटणी देत असतात. या सात चक्रांचे संतुलन गरजेचे असते. सप्तचक्र योगांमध्ये या सात चक्रांचा अभ्यास केला जातो. सप्तचक्र योगसाधनेमुळे जीवनात स्थैर्य, आत्मविश्वास आणि यशप्राप्ती होते. त्याच्या योग्य साधनेतून आयुष्यात सकारात्मक बदल घडतात. त्यामुळे सप्तचक्र योगसाधनेला आपण महत्वाचे स्थान द्यायला हवे,” असे प्रतिपादन चक्रयोग फाउंडेशनच्या संस्थापिका नीता सिंघल यांनी केले.
चक्रयोग फाउंडेशन, रुद्र सेंटर आणि नीना नाहटा यांच्या वतीने सातारा रस्त्यावरील हॉटेल उत्सव येथे आयोजित नीता सिंघल यांच्या ‘सप्तचक्र योग-यु आर मोअर’ या विषयावरील मोफत कार्यशाळेत त्या बोलत होत्या. प्रसंगी संयोजिका नीना नाहटा, ‘मिसेस इंडिया २०१८’ डॉ. पल्लवी प्रसाद आदी उपस्थित होते. यावेळी सप्तचक्र साधना, त्याचा उपयोग, व्यक्तीगत व व्यावसायिक प्रगतीसाठी योगसाधना, योगसाधनेद्वारे चक्रसाधनेचा समतोल याबाबत नीता सिंघल यांनी मार्गदर्शन केले. सहभागी झालेल्या प्रत्येकाला विशेष उर्जास्त्रोत असलेले रुद्राक्ष व चक्रसाधनेची माहितीपुस्तीका देण्यात आली.
नीता सिंघल म्हणाल्या, ”सप्तचक्र योग हा ज्ञानयोग असून, त्यात ज्ञान आणि ध्यानाच्या माध्यमातून समुपदेशन केले जाते. सप्तचक्र योगाच्या सहाय्याने लोकांच्या मनातील भीती, काळजी, ताण-तणाव दुर होतो. शरीरातील चक्रांचे असंतुलन का होते, ते संतुलीत ठेवण्यासाठी काय करायला हवे, याबद्दल मागर्दर्शन केले जाते. लोकांमधील नकारात्मकता वाढत आहे, अशा परिस्थितीत त्यांना सप्तचक्र योग साधनेतून साकारत्मकतेकडे नेण्याचा प्रयत्न आहे. चक्रसाधना शास्त्राला आज बऱ्याच ठिकाणी मान्यता मिळत आहे. रुद्राक्ष शंकराचा अंश आहे. त्याचा वापर केल्याने आपल्या जीवनात आनंदाचे क्षण येतात. रुद्राक्ष कोणीही, कोणत्याही वयात घालू शकते. त्याबद्दलच्या चुकीच्या कल्पना आपण मनातून काढून टाकाव्यात.”
नीना नाहटा म्हणाल्या, ”सप्तचक्र योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या विषयावर केनिया, दुबई, जम्मू कश्मीर, गुजरात, मुंबई आदी ठिकाणी कार्यशाळा घेण्यात येतात. या साधनेच्या माध्यमातून आर्थिक, शारिरीक, मानसिक समस्या सोडविण्यात यश मिळत आहे. हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा, यासाठी आम्ही मोफत कार्यशाळेचे आयोजन करत आहे. आजवर देशभरात आणि परदेशातही अनेक कार्यशाळा झाल्या असून, वीस हजारांहून अधिक लोकांनी सप्तचक्र योगसाधना केली आहे.”