इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायालयाने मंगळवारी हा ऐतिहासिक निकाल दिला. मुशर्रफांनी 3 नोव्हेंबर 2007 रोजी देशाची राज्यघटना स्थगित करून आणीबाणी लागू केली होती. या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध डिसेंबर 2013 मध्ये सुनावणी सुरू झाली होती. मार्च 2014 मध्ये त्यांना देशद्रोह प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. परंतु, वेग-वेगळ्या अपीलांवर सुनावणी सुरू असल्याने शिक्षेवरील निकालात टाळा-टाळ झाली. याच दिरंगाईचा गैरफायदा घेत मार्च 2016 मध्ये मुशर्रफ पाकिस्तान सोडून दुबईला पसार झाले.
मृत्यूदंडापासून वाचण्यासाठी आधीच हायकोर्टात दाखल केली याचिका
माजी लष्करशहा जनरल मुशर्रफांनी 1999 ते 2008 पर्यंत पाकिस्तानचे नेतृत्व केले. कोर्टात खटला चालवण्यात आलेले ते पाकिस्तानचे पहिलेच लष्करशहा आहेत. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो आणि लाल मशीदच्या धर्मगुरूंच्या हत्येप्रकरणी त्यांना कोर्टाने आधीच फरार घोषित केले आहे. मुशर्रफ यांच्या वकिलांनी गेल्या आठवड्यातच लाहोर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये विशेष न्यायालयात होणाऱ्या सुनावणी आणि येणारा निकाल थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष न्यायालयाच्या स्थापनेविरोधातच हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. अशात आपल्याविरुद्ध या कोर्टात खटला चालवणे एक राजकीय कट आहे असा आरोप मुशर्रफ यांनी केला होता.
नेहमीच आजारपणाचे कारण देऊन सुनावणीत गैरहजर
मुशर्रफ यांना पाकिस्तानच्या विशेष कोर्टासह हायकोर्टाने सुद्धा वेळोवेळी समन्स बजावले आहेत. परंतु, प्रत्येक वेळी आजारपणाचे कारण देत त्यांनी गैरहजेरी नोंदवली. रुग्णालयातील अंथरुणाशी खिळलेल्या मुशर्रफ यांचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला होता. त्यामध्ये ते म्हणतात, “देशद्रोहाच्या खटल्यात काहीच तथ्य नाहीत. देशद्रोह तर सोडाच, मी तर या देशाची नेहमीच सेवा केली आहे. कित्येकवेळा पाकिस्तानसाठी युद्ध लढवले आहेत. 10 वर्षांची सेवा दिली असताना आज माझ्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला चालवला जात आहे. माझे काहीच ऐकून घेतले जात नाही. माझ्या विरोधात चौकशी समित्या आवश्य बनवा, पण त्यांनी एकदा येऊन माझी प्रकृती पाहावी, माझा जबाब नोंदवावा त्यानंतरच कारवाई करावी. या चौकशी समितीचे कोर्टाने देखील ऐकायला हवे. मला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवतो.”