पुणे : शहरात संचारबंदी सुरू असताना सिलेंडरचा बेकायदेशीररीत्या साठा करुन ग्राहकांना जादा दराने सिलेंडरची विक्री करण्यात येत असल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने 33 हजार रुपयांचे सिलेंडर जप्त करून विनापरवाना विक्री करणाऱ्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
अमित सुगंधचंद गोयल (वय 30, रा.कोडियाड सोसायटी, सुंदराबाई शाळेजवळ, चंदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या गॅस एजन्सी चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथील सागर पार्क, लेन नंबर दोन येथे एका गॅस एजन्सी धारकाकडून अत्यावश्यक वस्तु कायद्याचा भंग करून 796 रुपये किंमतीचा घरगुती सिलेंडर ग्राहकांना एक हजार रुपयांना विक्री करीत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी अब्दुल करीम सय्यद यांना मिळाली.
त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक विजय झंजाड यांनी बनावट ग्राहक पाठवून सिलेंडर खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गोयल हा ग्राहकांना मुळ किंमतीऐवजी जादा दराने ग्राहकांना सिलेंडर विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे परवाना विचारण्यात आला. त्यावेळी त्याच्याकडे गॅस सिलेंडर विक्रीचा कोणत्याही कंपनीचा अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याच्याकडून विविध गॅस कंपन्यांचे भरलेले 16 गॅस सिलेंडर, रोकड, 48 ग्राहक कार्ड असा एकूण 33 हजार 733 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, खडकी परिसरात याच पद्धतीने बेकायदा गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्या गॅस एजन्सी चालक, मालक व कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा याच प्रकारची घटना घडली. पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय झंजाड, विवेक सिसाळ, कर्मचारी सुरेंद्र साबळे,संदिप मुंढे, दिपक चव्हाण,मोहन वाळके,आबा गावडे अन्न पुरवाठा व वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी केली.