इच्छुकांनी केलेल्या धडाकेबाज स्वागताने विद्यमानांना धडकी
पुणे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रा पुण्यात येताच या यात्रेच्या स्वागतासाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघातील इच्छुकांनी केलेल्या धडाकेबाज स्वागताने अनेक मतदार संघातील विद्यमान आमदारांचे धाबे दणाणले आहेत .तर मुख्यमंत्र्यांनी अशा धडाकेबाज स्वागताची विशेष नोंद ठेवली असणार आहे यात शंका नाही .
पर्वती मतदार संघात स्वागतासाठी रस्त्यावर सर्वत्र कमळ, नेते, यांचे फोटो असलेले फलक घेऊन कार्यकर्ते स्वागतासाठी तयारीत दिसत होते. सेव्हन लव्हज चौका पासून ते सारसबाग पर्यंत सर्वत्र रस्त्यावर ढोल ताशांच्या गजरात महाजनादेश यात्रेचे जोरदार स्वागत केले गेले. महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले या मतदार संघातून इच्छुक आहेत त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते या यात्रेचे स्वागतासाठी उभे होते. कुमार मॉल, सेव्हन लव्ह चौक, पौर्णिमा टॉवर परिसरात ठिकठिकाणी वाद्य पथक, हलगी पथक, ढोलताशा पथकं उभी केली होती. तसेच सुमारे १० हजार कार्यकर्ते, महिला फेटे घालून हातात स्वागताचे फलक घेऊन स्वागतासाठी उभे होते. सारसबागेजवळ स्वागताची जय्यत तयारी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, मावळे अशी वेशभुषा केलेले कलाकार मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला उभे होते. या ठिकाणी शनिवारवाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती. याच्या माध्यमातून फडणवीस सरकारने राज्यात आतापर्यंत राबविलेल्या योजना मांडल्या जात होत्या.