पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयातील इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ब्लॉकचेन टेक्नोलॉजी या विषयावर दोन दिवसीय राज्य स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे संयुक्त चिटणीस ॲड. भगवानराव साळुंखे व प्राचार्य डॉ. सुनील ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना श्री. अशोक रानडे यांनी आजच्या बदलत्या तांत्रिक युगामध्ये विद्यार्थ्यांनीही अद्यावत टेक्नोलॉजी शिकणे गरजेचे आहे. ब्लॉकचेन टेक्नोलॉजीचे फायदे व त्याची क्षमता लक्षात घेऊन अनेक अग्रगण्य संस्थांनी या तंत्रात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. जेथे व्यवहार केवळ आर्थिक व्यवहारांसाठीच नव्हे, तर ज्या ज्या व्यवहारांत सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे लागते, अशा सर्वच क्षेत्रांत ‘ब्लॉकचेन सिस्टीम’ अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. बँकांतर्गत आर्थिक देवाण-घेवाण व सुरक्षितता, विक्री व्यवस्थापन, घरे, कार व विविध वस्तू लीजवर देणाऱ्या कंपन्या, पुरवठा साखळीचे व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत या सिस्टीमचा उपयोग होणार आहे. अनेक क्षेत्रांत, अनेक पातळ्यांवर ‘ब्लॉकचेन सिस्टीम’ची उपयुक्तता अमर्याद अशीच ठरणार आहे. त्यामुळे ‘ब्लॉकचेन’ नजीकच्या भविष्यात आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनणार असल्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापकांनी ब्लॉकचेन टेक्नोलॉजी आत्मसात करणे अपरिहार्य आहे असे सांगून श्री. अशोक रानडे प्रोजेक्ट मॅनेजर, सॉफ्टलाइन कॅलिफोर्निया यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेस संस्थेचे संयुक्त चिटणीस ॲड. भगवानराव साळुंखे, प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे, श्री. अशोक रानडे, श्री. पंकज मित्तल, श्री. अतुल मराठे, कार्यशाळेचे समन्वयक प्रा.कमलेश जेठा, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या कार्यशाळेचे नियोजन समन्वयक प्रा. कमलेश जेठा यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. धनश्री जोशी यांनी केले.