पुणे,: पारंपरिक कलांचे पुनरुज्जीवन करणे आणि कारागिरांना रोजगाराचे शाश्वत साधन मिळवून देणे या दुहेरी उद्दीष्टाने भारतीय निर्यात-आयात बँक (एक्झिम बँक) ही संस्था भारतभरातील तळागाळातील उद्योजक व कारागीरांना मदत करीत आहे.
उत्पादन विकास, डिझाइन आणि पॅकेजिंग या कामांमध्ये बॅंक या कारागिरांना मोलाचे साह्य देत असते. या साह्यामध्ये प्रशिक्षण देणे, कार्यशाळा आयोजित करणे व कर्जाची उपलब्धता करून देणे यांचा समावेश होतो. यात कारागिरांच्या पुढील पिढीने वर्षानुवर्षे, पिढीजातपणे चालत आलेल्या हस्तकलेचे कौशल्य आत्मसात करावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि देशाचा एक समृद्ध वारसा जतन करून त्याला देशात व परदेशांत लौकिक मिळवून द्यावा, असा उद्देश आहे.
हे प्रयत्न आणखी बळकट करण्यासाठी, एक्झिम बँकेने संपूर्ण भारतातील हस्तनिर्मित पारंपारिक आणि समकालीन कला, हस्तकला आणि वस्त्रोद्योगांचे प्रदर्शन-सह-विक्री हा उपक्रम आयोजित केला आहे. ’एक्झिम बाजार’ (’बाजार’) हा तीन दिवसीय कार्यक्रम 24 ते 26 जानेवारी, 2020 (शुक्रवार ते रविवार) सकाळी 10:00 ते सायंकाळी 07:00 या वेळेत डच पॅलेस, रेसिडेन्सी क्लबच्या समोर, पुणे येथे होणार आहे. एक्झिम बाजार हा उपक्रम सर्वप्रथम सप्टेंबर 2017 मध्ये सादर करण्यात आला. त्यास अनेक कारागिरांनी प्रतिसाद दिला असून त्यांना त्यातून आर्थिक यश व उत्पन्नाचे साधनही मिळाले आहे.
या बाजारामध्ये पारंपारिक आणि समकालीन हस्तकलेची कारागिरी पाहायला मिळते. हाताने विणलेली फुलकारी, क्रिस्टल ज्वेलरी, मधुबनी पेंटिंग्ज, सांझी पेपर कटिंग, वरंगळ कार्पेट्स, जम्मू आणि काश्मीरमधील पश्मीना, कलमकारी, बिद्रीवेअर, टेराकोट्टा, डोक्र्रा, वारली, पटुआ मीनाकारी, चंदेरी, ब्लॉक प्रिंटेड गारमेंट्स, पारंपारिक गृहसजावटी आणि अशा अनेक छोट्या कलाकुसरी एकाच छताखाली येथे उपलब्ध आहेत. बाजाराच्या सध्याच्या या (सहाव्या) आवृत्तीत 50 हून अधिक कागागिर त्यांची कलाकुसर प्रदर्शित करीत आहेत.
एक्झिम बँकेचे महाव्यवस्थापक उत्पल गोखले यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले आणि हे व्यासपीठ भारताच्या पारंपारिक कला व हस्तकलांबद्दल जागरूकता निर्माण करेल, असे प्रतिपादन करून या कारागिरांना प्रोत्साहन दिले. ”कारागीरांना उपजीविकेचे टिकाऊ साधन म्हणून अद्वितीय शिल्प वस्तूंचे उत्पादन करण्यास प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याचा हा प्रयत्न आहे, ज्यायोगे हस्तकला टिकवणे सुनिश्चित होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर, हस्तनिर्मित उत्पादनांची मागणी आणि मूल्य वाढत आहे, अशावेळी यातील अफाट असा वाव लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर ही कलाकुसर प्रदर्शित करण्याचा एक्झिम बँकेचा मानस आहे,” असे गोखले म्हणाले.
गोखले पुढे म्हणाले, की ‘ग्रासरुट इनिशिएटिव्ह्ज फॉर डेव्हलपमेंट अँड मार्केटींग अॅडव्हायझरी सर्व्हिसेस’ (जीआरआयडी-एमएएस) या उपक्रमाच्या माध्यमातून भारतातील तळागाळातील उद्योजकांच्या वस्तू व सेवांची बाजारपेठ विकसीत करण्यास एक्झिम बॅंक हातभार लावते. बँक तळागाळातील अनेक कारागीरांची निवड करीत आहे आणि त्यांना अत्याधुनिक डिझाईन्स, पॅकेजिंग तंत्रे आणि बाजारपेठेची आवश्यकता यावर प्रशिक्षण देत आहे, ज्यायोगे त्यांना नवीन उपयुक्त उत्पादने पुढे आणण्यास मदत झाली आहे, त्याच वेळी पारंपारिक कला जतन करुन ठेवण्याचेही काम या माध्यमातून होत आहे. नवीन रंग, पोत, आकर्षक स्वरूप आणि त्याच वेळी पर्यावरणास अनुकूल अशा साहित्याला व वस्तूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात मागणी आहे. डिझाईन जगतात अशा वस्तूंना प्रचंड वाव असतो. तिथे ही उत्पादने केवळ भारताचा समृद्ध वारसाच बाळगतात असे नाही, तर दैनंदिन आयुष्यातही ही उत्पादने वापरली जातात. त्यामुळे या उत्पादनांची विक्री करण्याचा उपक्रम आर्थिकदृष्ट्या चिरंतन बनतो. या बाजारात सहभागीं झालेल्या कारागिरांना केवळ लगोलग होणारी विक्री एवढाच लाभ मिळत नाही, तर कॉर्पोरेट व रिटेल खरेदीदारांशी संपर्क साधण्यासही त्यांना मदत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे खरेदी करणाऱ्यांनादेखील भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची जाणीव होते आणि भारत जगाला किती विविध कलाकृती देऊ शकतो, हेही त्यांना दिसून येते.