पणज– गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे ९ जानेवारी आणि २३ जानेवारी २०२० रोजी अष्टविनायक सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाने वाजवी किंमतीत आरामदायी प्रवास, दर्शन, वास्तव्य आणि इतर सुविधा देणाऱ्या अष्टविनायक सहलीचा आराखडा तयार केला आहे.
या सहलीदरम्यान सर्व गणेशभक्तांना महाराष्ट्र राज्यातील अष्टविनायकाचे दर्शन घेण्याची अनोखी संधी मिळणार असून या सहलीत मयुरेश्वर (मोरगाव), सिद्धीविनायक (सिद्धटेक), चिंतामणी (थेऊर), महागणपती (रांजणगाव), गिरीजात्मज (लेण्याद्री), विघ्नेश्वर (ओझर), वरदविनायक (महाड) आणि बल्लाळेश्वर (पाली) यांचा समावेश आहे. ही सहल स्थानिक गोवेकरांना अष्टविनायकाचे दर्शन घडवून आणेल.
ही सहल गुरुवारी संध्याकाळी सुरू होणार असून रविवारी संध्याकाळी संपेल. त्यामध्ये तीन दिवस व तीन रात्रींचा समावेश असेल. जीटीडीसीने या सहलींची किंमत प्रती व्यक्ती ५९९९ रुपये ठेवली असून त्यामध्ये स्वतंत्र गाईड सेवेचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये हॉटेलमधील वास्तव्य आणि प्रवासाचा खर्चही समाविष्ट आहे. संपूर्ण सहलीचे आयोजन गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे करण्यात आले आहे. पिक अपची व्यवस्था पर्यटन भवन पाटो, पणजी येथून संध्याकाळी ७.१५ वाजता आणि म्हापसा रेसिडेन्सी येथून रात्री ८ वाजता करण्यात आली आहे.