पुणे-शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनासंदर्भात जागरूकता तयार करण्यासाठी व त्यांना पर्यावरणाच्या समस्यांची जाणीव करून देण्यासाठी कल्याणी समूहाच्या कल्याणी स्कूलतर्फे ‘मॅड अबाउट एन्व्हॉरमेंट’ हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अशाप्रकारच्या समस्यांविषयी तळागाळात जागरूकता निर्माण केल्यास, बदल घडवून आणण्यासाठी व पर्यायाने पृथ्वीस अधिक चांगली बनवण्यासाठी मदत होईल यावर कल्याणी स्कूलचा विश्वास आहे.
या कार्यक्रमाची सांगता एक दिवसीय प्रदर्शनाने करण्यात आली. या प्रदर्शनासाठी सर्व इयत्तांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक वर्षभर तयारी करत होते. विद्यार्थ्यांनी माहितीपर स्टॉल तयार करून इतरांना अधिक चांगली यंत्रणा तयार करण्यास पुढील पावले उचलण्यासाठी दमदार पाया घालून दिला. या प्रदर्शनामध्ये स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, द गॅलरी (मुलांनी तयार केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन), मंच (सांस्कृतिक कार्यक्रम), द बझार (कारागिरांनी आपली कला दर्शवण्यासाठी मांडलेली दुकाने), खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यांचा समावेश होता.
‘मॅड अबाउट एन्व्हॉरमेंट’ मध्ये विविध कार्यक्रमांची मालिका गुंफण्यात आली होती व त्यात गाणी, नृत्य सादरीकरण, स्ट्रीट शोज यांचा समावेश होता. या कार्यक्रमातून आयुष्याचे आवश्यक पैलू मांडण्यात आले. या कार्यक्रमातून मुलांमध्ये विविध उपक्रम तसेच प्रशिक्षणातून सकारात्मक भावना तसेच पर्यावरण संरक्षणाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली.
प्रत्येक वर्षी कल्याणी स्कूलतर्फे वार्षिक संकल्पना निवडली जाते. हवामानातील बदल आणि पर्यावरणाशी संबंधित प्रदूषण, लोकसंख्या, पाण्याचे दुर्भिक्ष अशा समस्यांमुळे शाळेने यंदा पर्यावरण संवर्धनाची संकल्पना निवडली होती.