पुणे-: भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या व सर्वाधिक नावाजल्या जाणाऱ्या पायाभूत सोयीसुविधा कंपन्यांपैकी एक टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडने पुणे मेट्रो भुयारी लाईनच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आल्याची घोषणा केली आहे. पुण्यातील कृषी महाविद्यालय मैदानापासून महाप्रचंड टनेल बोअरिंग मशीनच्या कामाला हिरवा झेंडा दाखवून हे काम सुरु करण्यात आले आहे.या संस्मरणीय आणि ऐतिहासिक प्रसंगी पूजा करून पारंपरिक पद्धतीने कामाचा शुभारंभ करण्यात आला. महामेट्रो आणि टाटा प्रोजेक्ट्सचे वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या प्रकल्प कार्यान्वयन टीम्स यावेळी उपस्थित होत्या. पहिल्या कास्टिंग स्लॅबला त्याच्या इच्छित जागी ठेवण्याआधी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावर स्वाक्षऱ्या देखील केल्या.
टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. विनायक देशपांडे यांनी सांगितले, “लखनौ मेट्रो, मुंबई मेट्रो आणि त्यानंतर आता तिसऱ्या मेट्रोचे भुयारी काम करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. त्याचप्रमाणे हे आमचे एकंदरीत मेट्रोच्या कामाचे (भुयारी व एलिव्हेटेड) सातवे पॅकेज आहे. आतापर्यंत मेट्रो रेल विभागातील कामे, कौशल्ये यांचा अतुलनीय अनुभव आमच्या गाठीशी जमा झाला आहे. कामातील सर्व अडचणी व आव्हानांचा संपूर्ण क्षमतांनिशी सामना करत हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला जाईल याबद्दल आमच्या टीम्सना ठाम विश्वास आहे.”
महाप्रचंड टनेल बोअरिंग मशीनचे काम सुरु झाले असून जमीन पृष्ठभागाच्या ६५ फीट ते १०० फीट खाली खोलीवर खोदकाम केले जाईल. या मशीनची लांबी जवळपास २७९ फीट आहे ज्यामध्ये बॅक-अप गॅन्ट्रीचाही समावेश आहे. यातील कटर हेड बोअरिंगचे काम करते व मशीन पुढे जाते. यामध्ये विविध हात असून ते संपूर्ण भुयारात सी आकाराचे काँक्रीट सेक्शन्स ठेवत जातात.पुणे मेट्रोची भुयारी लाईन शिवाजीनगर ते स्वारगेट असा तब्बल ८.२ किमी लांबीचा प्रवास करते व यामध्ये ५ स्थानके आहेत. या भुयारी लाईनच्या पॅकेज एकमध्ये दोन तर पॅकेज दोनमध्ये तीन स्टेशनांचा समावेश आहे.
या प्रोजेक्टबद्दल टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरचे सीओओ श्री. राहुल शाह यांनी सांगितले, “पुण्यातील अतिशय दाटीवाटीची वस्ती असलेल्या भागांमधून जाणाऱ्या या प्रतिष्ठित प्रकल्पाच्या कामाची सुरुवात झाली हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. आमच्या टीम्स अतिशय कुशल आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणावरील आव्हानात्मक प्रकल्पाचे काम करण्याचा दीर्घ अनुभव आणि उच्च कौशल्ये त्यांच्याकडे आहेत. आम्हाला पक्की खात्री आहे की या प्रकल्पामुळे शहरांतर्गत वाहतुकीमध्ये मोठे परिवर्तन घडून येईल व ती आंतरराष्ट्रीय दर्जाची बनेल.”
टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड
टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड ही भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या व सर्वाधिक नावाजल्या जाणाऱ्या पायाभूत सोयीसुविधा कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीने आजवर अनेक मोठमोठ्या आणि जटिल शहरी व औद्योगिक पायाभूत सोयीसुविधा प्रकल्पांचे कार्यान्वयन यशस्वीपणे पार पाडले आहे.
इंडस्ट्रियल सिस्टिम एसबीजी, कोर इन्फ्रा एसबीजी, अर्बन इन्फ्रा एसबीजी आणि सर्व्हिसेस एसबीजी हे टाटा प्रोजेक्ट्सचे चार स्ट्रॅटेजिक बिझनेस ग्रुप्स आहेत.
ऊर्जा निर्माण यंत्रे, ऊर्जा प्रेषण आणि वितरण व्यवस्था, संपूर्णपणे एकात्मिक रेल व मेट्रो व्यवस्था, व्यावसायिक इमारती, विमानतळे, रासायनिक प्रक्रिया कारखाने, पाणी व सांडपाणी व्यवस्थापन सुविधा, संपूर्ण खाण व धातू शुद्धीकरण व्यवस्था इत्यादींमध्ये ही कंपनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व सेवासुविधा प्रदान करते.
प्रकल्प आखून दिलेल्या वेळेत पूर्ण करणे, जागतिक स्तरावरील प्रकल्प व्यवस्थापन तंत्रांचा वापर आणि सुरक्षेबाबत जराही तडजोड न करणे यासाठी या कंपनीला अतिशय नावाजले जाते.