पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन केले आहे. दोघेही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतील याचा मला विश्वास आहे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तर दोघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकासरथ वेगाने पुढे जाईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून चालू असलेला राज्याच्या सत्ता स्थापनेचा तिढा आज अखेर सुटला. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज सकाळी ८ वाजता राजभवनात हा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोघांना शपथ दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याबद्दल त्यांचे अभिनंदन. दोघंही मिळून महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतील याचा मला विश्वास आहे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तर ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन. तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास रथ वेगाने पुढे जाईल हा ठाम विश्वास आहे’, असं ट्विट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केले आहे.