पुणे – गुप्तचर संघटना आणि लष्कराचे वेगवेगळे ऑपरेशन हे एकमेकांच्या हातात हात घालून एकत्रित काम करत असतात. शत्रुच्या गोट्यातील गोपनीय माहितीची जुळवाजुळव करून ती लष्कराला मिळत असते. रिसर्च अॅण्ड अॅनेलिसिस विंग (रॉ) संघटनेच्या गुप्तचर कामकाजामुळेच लष्कराचे ऑपरेशन यशस्वी होतात असे मत भारतीय लष्कराचे नवनियुक्त लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनाेज नरवणे यांनी व्यक्त केले आहे. ज्येष्ठ पत्रकार नितीन गोखले लिखित ‘आर.एन.कोवो-जंटलमन स्पायमास्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘रॉ’ चे माजी विशेष सचिव वाप्ला बालचंद्रन, माजी आयपीएस अधिकारी जयंत उमराणीकर, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे प्रशांत गिरबने व्यासपीठावर उपस्थित होते.
31 डिसेंबरला स्वीकारणार लष्करप्रमुख पदाची सूत्रे
विजय दिवसला सरकारने लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. 31 डिसेंबर 2019 पासून ते लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांची जागा घेणार आहेत. सध्या लष्कराचे उप-प्रमुख असलेले नरावणे यांनी पुण्यात एका कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. आपल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते स्वतंत्र भारताचे 28 वे लष्करप्रमुख ठरतील. नरवणे हे विद्यमान लष्करप्रमुख रावत यांच्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार सर्वात वरिष्ठ लष्करी अधिकारी आहेत. गेल्या 37 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक कमांड आणि शांतता मोहिमांचे नेतृत्व केले आहे. जम्मू काश्मीरातील दहशतवाद विरोधी मोहिमांचे त्यांनी संचालन सुद्धा केले आहे. शिख लाइट रेजिमेंटचे अधिकारी राहिलेले नरवणे यांनीच सर्वात प्रथम ईशान्य सीमांवर युद्ध सराव घेतले होते.