मुंबई-उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना फोन केला होता आणि फोनवरुन त्यांनी या सोहळ्यासाठी राज ठाकरे यांना निमंत्रण दिलं आहे. या निमंत्रणाचा स्वीकार राज ठाकरेंनी केला आहे आणि ते या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तापेचावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या शनिवारी जी शपथ घेतली त्यानंतर त्यांनी कोणतंही भाष्य केलं नाही.
सरकार कोसळल्यानंतरही त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आज राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराशेजारीच शिवाजी पार्क हे मैदान आहे. याच मैदानावर शपथविधीची तयारी पूर्ण झाली आहे. आता राज ठाकरे यांनी या शपथविधी सोहळ्याला हजर राहण्यास सहमती दर्शवली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली. या महाविकास आघाडीने त्यांचा मुख्यमंत्रिपदाचे नेते म्हणून उद्धव ठाकरेंची निवड केली. मंगळवारी रात्री याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला आणि या सगळ्याला तीन पक्षांच्या नेत्यांनी अनुमोदनही दिलं. जयंत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर शपथविधी सोहळ्यासाठी १ डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र ही तारीख २८ नोव्हेंबर करण्यात आली. ज्यामुळे आजच हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.