Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली

Date:

पुणे, दि. 19 : पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. राजेश देशमुख आज बुधवारी सकाळच्या सुमारास रुजू झाले. डॉ. राजेश देशमुख हे भारतीय प्रशासकीय सेवेतील कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जात असून सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकिर्द उत्कृष्ट राहिली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००८ च्या तुकडीतील ते अधिकारी आहेत. आज प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून त्यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.

डॉ. राजेश देशमुख हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००८ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. एमपीएससी परीक्षेत राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी मिळविला आहे. विधान परिषदेचे तत्कालिन विरोधी पक्षनते धनंजय मुंडे यांचे खाजगी सचिव म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आयएएस श्रेणीत निवड झाल्यानंतर डॉ. देशमुख यांनी पहिल्यांदा सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. त्यांच्या त्या कारकिर्दीत जिल्हा परिषदेचा आलेख सातत्याने उंचावत गेला. सुरुवातीला जिल्ह्याचा ६२ हजार शौचालयांचा अनुशेष पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. माण, खटाव, कोरेगावसारख्या तालुक्यात दुष्काळमुक्ती व रोजगारनिर्मितीसाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक अभियानाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील ७२ गावांचा कायापालट करुन दाखवला. गावात आरोग्य, शिक्षण, रोजगार आदी पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर त्यांनी भर दिला. गावांच्या विकासासाठी ११० कोटींचा आराखडा तयार करुन अंमलबजावणी केली. खाजगी उद्योग, स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन त्यांनी काम केलं. डिजीटल शाळा, विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढ, बालविकास, बचतगट चळवळ सक्षम करणं, अशा अनेक स्तरांवर त्यांची कामगिरी सरस ठरली आहे. स्वच्छ भारत अभियान आणि पंतप्रधान आवास योजनेसारख्या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यानं त्यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर अव्वल यश मिळालं आणि त्याबद्दल डॉ. देशमुख यांचं राष्ट्रीय स्तरावर कौतुकही झालं आहे. अवघ्या १४ महिन्यात त्यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यपद्धतीत अमूलाग्र बदल घडवून जिल्हा परिषदेला वेगळी उंची प्राप्त करुन दिली.

यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही डॉ. राजेश देशमुख यांनी विशेष कामगिरी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात कापसावरील फवारणीमुळे एकावेळी २२ जणांचा मृत्यू झाला होता. डॉ. देशमुख यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर स्वत: फवारणीयंत्र हाती घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. फवारणीबाबत शेतकरी जनजागृतीसाठी अभियान सुरु केले, त्यांच्या प्रयत्नांमुळेच नंतरच्या दोन वर्षात जिल्ह्यात विषारी फवारणीमुळे एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाला नाही. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांनाही त्यांनी वठणीवर आणले. असहकार्य करणाऱ्या बँकांमधली सरकारी खाती बंद करुन त्यांनी त्या बँकांना शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास भाग पाडले. त्यांच्या या कृतीचे कौतुक राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीतही झाले होते. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, धडक सिंचन विहीर कार्यक्रम, सर्वांसाठी घरे, राष्ट्रीय महामार्गाचे काम, वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठीचे अधिग्रहण, ऑक्सिजन पार्क, शासकीय कामकाजात सुलभता अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून डॉ.राजेश देशमुख यांनी यवतमाळचे लोकप्रिय व यशस्वी जिल्हाधिकारी म्हणून जनमानसावर आपली छाप सोडली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी राबवलेला मागेल त्याला शेततळे कार्यक्रम प्रचंड यशस्वी ठरला. त्याअंतर्गत जिल्ह्यात ७ हजार शेततळी निर्माण करण्यात आली. ९०० शेततळ्यात मत्स्यशेती सुरु झाली. यातून शेतकऱ्यांना जोडव्यवसाय मिळाला. यवतमाळ जिल्ह्यात रेशीम शेतीला त्यांनी प्रोत्साहन दिले. १२ हजार धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम आखून यशस्वी केला. घरकूल योजना मिशन मोडवर राबविली. डॉ. राजेश देशमुख यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न केले आणि ते यशस्वीही झाले. यवतमाळमधील त्यांच्या कार्याचे राज्य व देशपातळीवर कौतुक झाले आहे.

जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारल्यानंतर बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. कोरोना रुग्णांची संख्या जास्त असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. पुणे जिल्हयातील कोरोनाची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता सुविधाही पुरेशा प्रमाणात आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कोरोनाच्या उपाययोजना करून मृत्यूदर कमी करण्यावर भर देणार असून जम्बो सुविधा उभारणीला गती देणार आहे. पुणे मनपा, पिंपरी चिंचवड मनपा, पुणे व ग्रामीण व सर्व यंत्रणेतील समन्वयाने पुढच्या तीन आठवडयात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येईल. आपण सर्व मिळून कोरोनाला नक्की हरवूया, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

आज ते रुजू झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, जिल्‍हा नियोजन अधिकारी संजय मरकळे, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, सहायक नियोजन अधिकारी किरण इंदलकर व अन्य अधिका-यांनी त्यांचे स्वागत केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...