दीपक मानकर यांची माहिती; माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गौरव
पुणे (प्रतिनिधी) : भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावताना १९६५ साली पाकिस्तानविरोधात झालेल्या युद्धात अद्वितीय कामगिरी करणाऱ्या परमवीर चक्र विजेते कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार शहीद अब्दुल हमीद यांच्या वीरपत्नी श्रीमती रसुलन बीबी जी यांना यंदाच्या यशोदा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मानकर यांच्या मातोश्री स्व. सौ. मालतीताई माधवराव मानकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा हा पुरस्कार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पाच मे रोजी दुपारी साडेचार वाजता बालगंधर्व रंग मंदिरात प्रदान करण्यात येणार आहे.
दीवा प्रतिष्ठान आणि वीर हनुमान मित्र मंडळाच्या वतीने हा पुरस्कार गेल्या तीन वर्षांपासून दिला जात असून खडतर आणि संघर्षमय वाटेने जाणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना हा पुरस्कार दिला जातो. गौरव सोहळ्यास ज्येष्ठ उद्योजक विठ्ठलशेठ मनियार, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, इस्लामचे अभ्यासक अनिस चिश्ती, ब्रिगेडीयर प्रसाद जोशी, शहीद अब्दुल हमीद यांचे नातू जमील आलम, सैनिक मित्र आनंद सराफ आणि उद्योजक मयूर जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेस वीर हनुमान मंडळाचे संस्थापक दत्ता सागरे, दीवा प्रतिष्ठानचे संस्थापक हर्षवर्धन मानकर, अध्यक्ष करण मानकर उपस्थित होते.
पुरस्काराची माहिती देऊन मानकर म्हणाले, ‘देशसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सैनिकांप्रती सामान्य नागरिक म्हणून असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमच्या मातोश्रींच्या नावाने हा पुरस्कार वीरपत्नी रसुलन बीबी जी यांना देताना पुणेकरांनीही मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. परमवीर चक्र विजेते हवालदार शहीद अब्दुल हमीद यांच्यानंतर पत्नी रसुलन यांनी धैर्याने आयुष्याला सामोरं जात कुटुंबियांना साथ तर दिलीच पण अनेक तरुणांना यामुळे सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणाही मिळाली.