पुणे, दि. 1 : राज्य शासनासह पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घेवून स्व:चा समाजिक व आर्थिक विकास करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी केले.
भोसरी गावठाण येथील श्रीराम मित्र मंडळ येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या संवादपर्व कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, मंडळाचे अध्यक्ष मचींद्र लांडगे, कार्यअध्यक्ष विक्रांत लांडगे, सुनील लांडगे, भरत लांडगे, अपस्थित होते.
श्री ऐवले म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांसाठी महानगरपालिकेने नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यामधील काही योजना वर्षाभर सुरु असतात तर काही कालमर्यादीत योजना असतात. यामध्ये महिला व बालकल्याण योजना, मागासवर्गीग कल्याणकारी योजना, अपंग कल्याणकारी योजना, खेळाडू कल्याणकारी योनांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. तसेच इतर कल्याणकारी योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते पदव्युतर पर्यंत शिक्षण घेणाऱ्या महापालिका हद्दीतील अनाथ, निराधार मुलांना शिष्यवृत्ती एच.आय.व्हीबाधित मुलांचा संभाळ करणाऱ्या पालकांना व संस्थांना अर्थ सहाय्य करण्यात येते. तसेच अशा व्यक्तींना महानगरपालिके तर्फे पी.एम.पी.एल चा मोफत बस पास देखील देण्यात येतो, अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी शासनाचे मुखपत्र असणाऱ्या लोकराज्य या पाच भाषेत प्रकाशित होणाऱ्या मासिकासंबंधी माहिती उपस्थित नागरिकांना दिली.
यावेळी श्रीराम मित्र मंडळाचे पदाधिकारी महेश मरे, विनोद गावडे, महेश लांडगे, प्रशांत लांडगे, अक्षय भुजबळ, दिनेश पठारे, अनील लांडगे, तसेच विलास कसबे, मिलिंद भिंगारे, रोहित साबळे, मोहन मोटे, व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.