चला घरावर फडकवूया तिरंगा…

Date:

भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे.  या स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून गेल्या 75 वर्षांत भारताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे हा आपल्या सर्वांसाठीच अभिमान आणि गौरवाचा क्षण आहे. अमृत महोत्सवाचा हा गौरव सोहळा संपूर्ण देशभर आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे, या उद्देशाने केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने दि. 13 ते दि. 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये देशभरात “हर घर झेंडा’’  म्हणजेच ‘घरो घरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करायची आहे. या अनोख्या उपक्रमात भारतीय नागरिक म्हणून आपण सर्वांनीच सहभागी व्हायला हवे. राष्ट्रध्वजाप्रती आदर दाखविण्यासाठी प्रत्येकाने या कालावधीत आपल्या घरावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवायला हवा.

‘हर घर झेंडा’ अर्थात ‘घरो घरी तिरंगा’ अभियान यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग घेण्यात येत आहे. आपल्यामधील असलेले राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम या अभियानाअंतर्गत होणार आहे. राज्यातील शेतकरी, महिला, शाळकरी मुले याबरोबरच स्वयंसेवी संस्था, वेगवेगळ्या सहकारी संस्था या सर्वांचा सहभाग यामध्ये घेतला जाणार आहे. राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर आणि वॉर्ड किंवा ग्रामस्तरीय लोकसहभागातून कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या प्रत्येकाची आठवण आपण ठेवणे हे आपल्या प्रत्येकाचे काम असून आजच्या पिढीला त्यांचे महात्म्य, त्यांचे कार्य आणि विचार समजणे यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘घरो घरी तिरंगा’ हा उपक्रम राज्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपरिषदा यांच्या माध्यमातून या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आखणी करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातही प्रत्येक नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन स्वतःचे घर, कार्यालय येथे अभिमानाने तिरंगा फडकवून हे अभियान यशस्वी करायला हवे.

‘घरो घरी तिरंगा’ या अभियानाअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान देशातील सुमारे 20 कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार असून संपूर्ण देश भारतमातेच्या सेवेत समर्पित असल्याचा एक संदेश आपण जगाला देणार आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनीही या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासनास सूचना केल्या आहेत.

‘घरो घरी तिरंगा’ त्यासाठी काय काळजी घ्यावी, कशा प्रकारे झेंडा असावा, यासंबंधीच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

भारतीय ध्वज संहितेचे काटेकोरपणे अनुपालन व्हावे

राष्ट्रध्वज हा आपली राष्ट्रीय अस्मिता आहे. केंद्रीय गृह विभागाच्या दि. 30 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेन्वये भारतीय ध्वज संहिता 2002 भाग-1 मधील परिच्छेद 1.2 मधील राष्ट्रध्वज हे “हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर/सुत/सिल्क/खादी कापडापासून बनविलेला असेल”, या तरतुदीमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत / पॉलिस्टर/ लोकर/ सिल्क/खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत, असा उल्लेख केला आहे. या बदललेल्या तरतुदीनुसार तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल. भारतीय ध्वज संहितेचे काटेकोरपणे अनुपालन व्हावे व जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी व त्यासाठी सातत्याने जाणिव जागृती निर्माण करावी. तसेच, प्लास्टिक ध्वजाचा वापर होऊ नये, यासाठी आपण सर्वांनी कटाक्षाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.

असा आहेकृती आराखडा

‘घरो घरी तिरंगा’ या उपक्रमाबाबतचा ग्रामपंचायती, आरोग्य यंत्रणा, रास्त भाव धान्य दुकाने, शाळा व महाविद्यालये, पोलीस, परिवहन, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत आदिंसाठी मार्गदर्शक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या प्रमाणे चर्चासत्रे आयोजित करणे, शासकीय कार्यालये, नागरिकांना ध्वजांचे वितरण करणे, लोक प्रतिनिधींनी सहभागी करून घेणे, प्रसिद्धी पत्रके, बॅनर्स, डिजिटल बोर्ड व गीतांच्या माध्यमातून तिरंगाची माहिती देणे, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्रे, शासकीय कार्यालये, रास्त भाव धान्य दुकाने, महानगरपालिका, नगरपालिका यांनाही ध्वज वितरण केंद्रे म्हणून काम करण्यास सूचित करण्यात आले आहे.

शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यामार्फत जाणीव-जागृती करणे. राष्ट्रध्वजाला समर्पित विशेष संमेलने / शिबिरे / चर्चासत्र इत्यादींचे आयोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक पोलिस स्टेशन परिसरात फलक, प्रसिध्दीपत्रके, उभे फलक (स्टॅंडी) लावणे व ध्वजारोहण करावे. पोलिस वसाहतींमध्ये राष्ट्रध्वजाची विक्री व वितरण केंद्रे निर्माण करण्याची विशेष मोहीम घ्यावी. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वसाहतीमध्ये / घरी ध्वजारोहण करावे. प्रत्येक पोलीस तपासणी नाक्यावर तिरंगा ध्वजाची प्रसिध्दीपत्रके लावण्यात येणार आहेत.

झेंडा तयार करताना ही काळजी घ्या

  • तिरंगा झेंड्याचा आकार आयताकार असावा.
  • तिरंगा झेंड्याची लांबी:रुंदी प्रमाण हे 3:2असे असावे.
  • तिंरगा बनविण्यासाठी खादी अथवा कॉटन, पॉलिस्टर, सिल्क कापडापासून बनविला जाऊ शकतो.
  • झेंड्यामध्ये सर्वात वर केशरी, मध्यभागी पांढरा व खाली हिरवा रंग असावा. मध्यभागी पांढऱ्या पट्टीवर 24 रेषांचे गोलाकार निळ्या रंगाचे अशोकचक्र असावे.

झेंडा फडकविण्याचे नियम

  • प्रत्येक नागरिकाने तिरंगा झेंडा संहितेचे पालन करावे.
  • तिरंगा झेंडा फडकविताना केशरी रंग वरच्या बाजून असावा.
  • अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला झेंडा कुठल्याही परिस्थितीत लावला जाऊ नये.
  • तिरंगा झेंडा उतरविताना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा.
  • दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर झेंडा उपक्रमांतर्गत लावण्यात येणारे झेंडे उपक्रम संपल्यानंतर प्रत्येकाने सन्मानाने व सुरक्षित ठेवावे.
  • उपक्रम संपल्यानंतर झेंडा फेकला जावू नये, तो सन्मानाने जतन करून ठेवावा.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना राबविण्यात येणाऱ्या ‘घरो घरी तिरंगा’ या उपक्रम/अभियानातून देशातील प्रत्येक घराघरात देशभक्तीची चेतना निर्माण होईल. स्वातंत्र्य संग्रामाचे स्मरण करून या अनोख्या अभियानात सर्वांनी एक दिलाने सहभागी होऊया आणि अभिमानाने, स्वयंस्फूर्ती आपल्या घरावर राष्ट्रध्वज उभारूया.

-नंदकुमार ब. वाघमारे

माहिती अधिकारीजिल्हा माहिती कार्यालय,ठाणे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...

नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

मतदारांना मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन पुणे, दि. १९: राज्य निवडणूक...

पेशवे पार्कमधील कोट्यवधींच्या शिवसृष्टीची दुरावस्था:भाजप व प्रशासन जबाबदार- शिवसेनेची निदर्शने

पुणे—पेशवे पार्कमधील कोट्यवधींची शिवसृष्टी धुळखात पडून ठेवण्यात आली आणि...