पुणे- एकीकडे मेट्रोच्या मार्गिकेची आखणी करतानाच ज्यांना संभाजी पुलावरून गणेश विसर्जन मिरवणूक जाते हे लक्षात घेण्याची आवश्यक्यता वाटली नाही आणि आता ते लक्षात आणून दिल्यावर यावर आता कोट्यावधी खर्च होतील म्हणून पहिलीच निर्बुद्ध पणे आखलेली मेट्रोची मार्गिका कायम ठेवण्यासाठी पण केलेल्या महापालिकेने दुसरीकडे मात्र एका बिल्डर साठी चक्क ९० कोटीचा रस्ता करण्याचे टेंडर काढल्याचे वृत्त आहे .यामुळे महापालिकेचा दुटप्पी चेहरा उघड होत आहे.
महापालिका प्रशासनाने बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर गंगाधाम चौकामध्ये उड्डाणपूल, भुयारी मार्ग; तसेच अस्तित्वात नसलेला २४ फुटी रस्ता सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) तयार करण्यासाठी ९० कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. या ठिकाणी विकसित करण्यात येणारा रस्त्या नव्याने आखण्यात आला असून, सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतचा निर्णय आता गुरुवारी सर्वसाधारण सभेत होणे अपेक्षित आहे . मंगळवारी मुख्य सभेत घडलेल्या संभाजी पुलावरील मेट्रोच्या निर्बुद्ध मार्गीकेमुळे झालेल्या गोंधळामुळे सभा तहकूब झाली आणि या प्रकल्पाबाबतचे अनेक ‘हिशेब’ फसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
गंगाधाम चौकातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असून, या ठिकाणी उपाययोजनांची मागणी करण्यात येत होती. या चौकात मोठे व्यापारी संकुल उभे राहत आहे. त्यामुळे भविष्यात होणारी वाहतूक कोंडी या व्यापारी संकुलासाठी कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी तातडीने ही वाहतूक कोंडी दूर करण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे. गंगाधाम चौकात उड्डाणपूल, भुयारी मार्ग तयार करण्याबरोबरच या व्यापारी संकुलाच्या पाठीमागून जाणारा प्रस्तावित रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ९० कोटी रुपयांच्या निविदा ‘पीपीपी’ तत्त्वावर विकसित करण्यासाठी काढण्यात आली आहे.
गंगाधाम चौकामध्ये उड्डाणपूल, भुयारी मार्ग; तसेच अस्तित्वात नसलेला २४ फुटी करण्यासाठीची निविदा मंगळवारी प्रकाशित झाल्यानंतर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमध्ये या निविदांवरून जोरदार फटाके फुटले. त्यानंतर या निविदेची ‘खोली आणि व्याप्ती’ सर्वसामान्यांसमोर उघड झाली. व्यापारी संकुलाच्या पाठीमागून डोंगराच्या कडेने २४ फूट रस्ता नव्याने तयार करण्यासाठी शहर सुधारणा समिती, स्थायी समितीने हा प्रस्ताव मान्य करून तो अंतिम मंजुरीसाठी मुख्य सभेपुढे ठेवला आहे. हा प्रस्ताव डिसेंबर महिन्याच्या कार्यपत्रिकेवर होता. त्यावर मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत निर्णय अपेक्षित होता. मात्र, संभाजी पुलावरील मेट्रोमार्गावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झडल्याने सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली.बिबवेवाडी-कोंढवा रस्ता ते गंगाधाम-शत्रुंजय मंदिर रस्ता या दोन्ही रस्त्यांना जोडणारा प्रस्तावित २४ मीटर रस्ता कलम २०५ अन्वये आखण्यात येत आहे. या रस्त्याची अंतिम मंजुरी ही मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण मिळणे अपेक्षित होते. अगदी त्याच दिवशी महापालिका प्रशासनाने हा रस्ता विकसित करण्याच्या निविदा प्रकाशित केल्या आहेत. त्यामुळे जो रस्ता अस्तित्वातही नाही, त्या रस्त्याच्या निविदा प्रकाशित करण्याची तारीख ही त्या रस्त्याल्या मंजुरी मिळणाऱ्या मुख्य सभेच्या तारखेच्याच दिवशीच यावी, हा निव्वळ योगायोग आहे की आणखी काय आहे, असा संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. ही सभा तहकूब झाल्याने दोन दिवसानंतर होणाऱ्या सभेत आता या रस्त्याच्या मंजुरीवर निर्णय अपेक्षित आहे.
संबधित गृहप्रकल्पाला अगदी मुंबई दिल्ली पासून शुभाशीर्वाद असल्याने येथे केलेले खोदकाम नष्ट केले डोंगर आणि नव्याने उभारले डोंगर , नव्याने बिल्डरनेच केले रस्ते , शिवाय येथील सुरुंगाच्या स्फोटाने अगदी रस्त्याच्या पलीकडील इमारतींना गेले तडे या सर्वाकडे अगदी पोलिसात ,आणि वरिष्ठ पातळीवर स्थानिक नागरिकांनी अर्ज करूनही काहीही उपयोग झालेला नाही . कित्येक शेकडो कोटींच्या या गृहप्रकल्पाने असंख्य नियम , कायदे पायदळी तुद्विल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे .

