पुणे :
‘स्वत:च्या वेदनांनी व्यापलेला जीवनपट घेऊन बा. सी. मर्ढेकर यांनी भोवतालच्या वास्तवविश्वाचे सत्यदर्शन घडविले.’ असे मत मर्ढेकर साहित्याचे अभ्यासक प्रा. अक्षयकुमार काळे यांनी व्यक्त केले.
‘रसिक मित्र मंडळ’ आयोजित ‘एक कवी-एक भाषा’ या काव्य व्याख्यानमालेत ते बोलत होते. कवी प्रदीप निफाडकर आणि ‘रसिक मित्र मंडळाचे’ अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला व्यासपीठावर उपस्थित होते. हा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी पत्रकार संघ सभागृहात झाला.
प्रा. काळे म्हणाले, ‘बा. सी. मर्ढेकर यांच्या कवितेची त्यांच्या हयातीत निंदा नालस्ती झाली. खटले-कज्जे झाले. आज मात्र आपण त्यांना मराठी नवकवितेचे जनक संबोधतो. स्वत:च्या वेदनांनी व्यापलेला जीवनपट घेऊन बा. सी. मर्ढेकर यांनी भोवतालच्या वास्तवविश्वाचे सत्यदर्शन घडविले. म्हणून केशवसुतांनंतर त्यांना लोकोत्तर नवकवी संबोधले जाते.’
मर्ढेकर यांचे व्यक्तिमत्त्व हे प्रेम कोषात मावणारे नव्हते, तर त्यांना समोरच वास्तवविश्व हाकारत होते. त्यामुळे त्यांच्या कविता वैश्विक जाणीवा घेऊन आल्या. दुसर्या महायुद्धाच्या अस्वस्थ पार्श्वभूमीवर, भांडवलशाहीच्या दिवसांत या कवीला दु:ख होत होते, त्यातून शोषणाचा आकार आणि प्रकार त्यांनी रेखाटला. त्यांच्या शब्दात उपहास असला, तरी अंतर्यामी खोल कणव होती.
‘क्रांतिकारक कविता लिहिण्याची हिंमत दाखवणारे ते कवी होते’, असेही प्रा. काळे म्हणाले.
कवी प्रदीप निफाडकर यांनी परिचय करून दिला. सुरेशचंद्र सुरतवाला यांनी उपक्रमांची माहिती दिली.


