पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक देशातील पंतप्रधानाची गळाभेट घेतात. यातून सर्व प्रश्न सुटतील असे वाटत नाही. उलट आपल्या देशाची विविधता आणि एकता ही खरी ताकद असून ती बिघडवण्याचे काम सध्या सुरु आहे. देशात नथुराम गोडसेचे मंदिर आणि मुर्त्या बनल्या जातात. त्यावर भाजप आणि आरएसएस काही बोलत नाही यातून त्यांची या प्रकाराला मूक संमती असल्याचे स्पष्ट होते.
“आपला देश चालवण्यासाठी केवळ ५६ इंच छाती असणा-या व्यक्तीची गरज नसून ५६ इंचाचे ह्रदय असणा-या पंतप्रधानाची गरज आहे, मोदींचे ह्रदय छोटे आहे” अशा शब्दांत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली. कॉंग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सिंह पुढे म्हणाले, केंद्र सरकारने तीन दिवसांपूर्वी जीएसटी देशभरात लागू केला. यासाठी देशभर जल्लोष देखील करण्यात आला. मात्र यापूर्वी या विषयाला विरोध करण्यात मोदीच आघाडीवर होते, आता तेच त्याचा सोहळा करत आहेत. जीएसटीतून पेट्रोल आणि अल्कोहोल वगळले आहे. काळे धन समाप्त करण्यासाठी जीएसटी आणल्याचे सांगितले जात असले तरी रिअल इस्टेट आणि अल्कोहोल या सर्वांत जास्त काळ्या पैशाचे व्यवहार चालणाऱ्या व्यवसायांना जीएसटीतून बाहेर काढले आहे. यातून सरकारची कार्यपध्दती दिसून येते. कोणत्याही प्रकारची तयारी न करता मोदी सरकारने ज्याप्रकारे नोटबंदी केली. त्याप्रमाणे कुठलीही पूर्वतयारी न करता जीएसटी लागू केला आहे.
भाजप यापूर्वी मोठ्या दंगली घडवत होते. आता लव्ह जिहाद, बीफ यांसह अन्य विषयांवरून देशात दंगल घडवण्याचे काम चालू आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी भाजपवर केला.