मुंबई- काही लोकांना जेलमध्ये टाकण्यासाठी माझ्याकडे गृहमंत्री द्यायला हवे आहे. आमचे सरकार येण्याआधीपासूनच मी मला गृहमंत्री करा असे सांगत होतो. प्रचारादरम्यानही मी हेच सांगत होतो. गृहमंत्री झालो तर मंत्रालयात बसून दिवसा ढवळ्या भ्रष्टाचार केलेल्यांना व लोकांचे मुडदे पाडणा-यांना मला जेलमध्ये टाकायचं आहे असे सांगत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली.
पर्यावरणदिनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान रामदास कदम यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. कदम म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांना व काही लोकांना मला जेलमध्ये टाकायचं आहे. मात्र, आमच्याकडे गृहमंत्रीपद आले नाही. मला जर गृहमंत्रीपद दिलं असतं तर या लोकांची काही खैर नव्हती.
शिवसेनेने गृहमंत्री मागितले होते पण दिले नाही याबाबत छेडले असता कदम म्हणाले, आम्हाला आजही गृहमंत्रीपद हवे आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा आमची ही मागणी आहे व बातमी करा म्हणजे मला गृहमंत्रीपद मिळेल असे वक्तव्य करीत कदमांनी पत्रकारांनाच अडचणीत आणले. कोणाकोणाला जेलमध्ये टाकायचं आहे असे विचारल्यावर मात्र क्षणभर नाव घेण्याच्या विचारात असतानाच त्यांनी आवरते घेतले व कोणाचेही नाव घेतले नाही.