पुणे – पाश्चत्य संगीताच्या प्रकरांमध्येही अस्सल देशी व मराठी संगीताचे नाणं खणखणीत वाजवून जगातील संगीत रसिकांना मंत्र मुग्ध कऱणा-या अजय – अतुल या संगीतकार जोडीला २७ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये कलर्स मराठी वाहिनीने पुणेकरांच्या साक्षीने मानाचा मुजरा केला. आज कलर्स मराठी तर्फे “ मानाचा मुजरा – अजय- अतुल” हा संगीतकार अजय – अतुल यांनी संगीत दिलेल्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम पुणे फेस्टीव्हलमध्ये गणेशकलाक्रिडा रंगमंच येथे सादर झाला. त्यात केवळ त्यांनी संगीतबद्ध केलेली केवळ गाणीच नव्हती तर त्याचा जोडीला त्यांच्या लहानपणापासूनचे असलेल्या साक्षीदारांनी ते संगीतकार कसे घडले आणि झाले याचा प्रवास उलगडला.
२७ व्या पुणे फेस्टीव्हलची संध्याकाळ रंगली ती गणेश कला क्रिडा रंगमंच येथे अजय-अतुलच्या संगीतात. प्रारंभी पुणे फेस्टीव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी कलर्स मराठी वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख संजय उपाध्ये यांचा स्मृतीचिन्हं देऊन सत्कार केला तर कार्यक्रमाची संकल्पना करणारे श्रीरंग गोडबोले यांचा सत्कार मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे यांनी केला. डॉ सतीश देसाई यांनी पुणे फेस्टीव्हल सुरू करण्यामागची कलमाडी यांची संकल्पना विषद केली. ब-याच काळानंतर अजय अतुलचा कार्यक्रम पुण्यात होत असल्याने पुणेकरांनी सहावाजल्यापासूनच गणेशकलाक्रिडात गर्दी केली होती.
कार्यक्रमाची सुरूवात झाली तरी अजय-अतुल दिसत नसल्याने रसिकांचे डोळे त्यांना शोधत होते. त्यांच्याच विश्वविनायक मधील प्रसिद्ध गणेश वंदना सुरू झाली. या दरम्यान रंगमचावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मोठे छायाचित्र आले आणि एकीकडे गणेशवंदना, नृत्याविष्कार सुरू असताना त्या छायाचित्राच्या मागून अजय-अतुलची एंट्री झाली अन प्रक्षागृहात गणपती बाप्पा मोरयाचा गरज सुरू झाला. शेवटी श्रीगणेशा देवा श्रीगणेशा देवा या गाण्यावर रसिकांनी जल्लोषच केला. गणेश वंदना झाल्यावर अतुल याने बोलताना सांगितले की, पहिल्यांदाच आम्ही आमचीच गाणी आमच्या पुणेकर कुटुंबाबरोबर बसून बघणार आहोत. रसिकांच्यात कलमाडी यांच्यासह निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते महेश कोठारे हे त्यांचे खास कौतुक कऱण्यासाठी उपस्थित होते.
त्यानंतर पुष्कर श्रोत्री आणि प्रसाद ओक यांनी निवेदनाची सूत्र हातात घेतली तिही गणपती बाप्पामोरया अशा घोषणा देतच. अजय अतुलबद्दल बोलताना त्यांनी थेट त्यांचे प्रथामिक शाळेतील शिक्षक व्ही. डी. कुलकर्णी सरांनी बोलवून बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या. त्यात अतुलने लहानपणी सिंहगडच्या पोवाडा गाऊन बक्षिस मिळवले होते. ते दोघेही लहानपणापासूनच सांस्कृतिक कार्यक्रम, त्यातही गाण्यांमध्ये दंग असायचे. या जोडीने शाळेला भजन स्पर्धेत बक्षिसेही मिळवून दिली असल्याचे कुलकर्णी सरांनी सांगितले.
आठवणींचा सुंगंध दरवळत असतानाच अनिरूद्ध जोशी याने वा-यावरती गंध पसरला आणि गालावर खळी अशी दोन एव्हरग्रीन गाणी सादर करून कार्यक्रमात रंग भरायला सुरूवात केली. त्यानंतर पुण्यातील डॉ. दिलीप देवधर यांच्या दवाखान्यात अतुल कम्पाउंडर म्हणून कसा काम करत होता आणि हे डॉक्टर – कंम्पाउंडर दवाखान्यात गाणी कसे म्हणायचे याच्या आठवणी सांगताना अजयकडे सूराचे तर अतुलकडे तालाचे ज्ञान असल्याचे नमूद केले. या जोडीला पहिला कीबोर्ड आणि सायकली घ्यायला याच डॉक्टर देधर यांनी मदत केली, आजही करतात असे अतुल यांने सांगितले. रसिकांच्यात बसून अजय-अतुल हे मधूनमधून संवाद साधत आठवणींचे रंग गडद करत होते. एकीकडे लहानपणापासून ते संगीतकार अजय-अतुल हा प्रवास आठणींच्या रूपाने उलगडत होता.दुसरीकडे त्यांचीच गाणी मोरया मोरया, लयभारी चित्रपटातील माऊली माऊली गाण्यावर अभिनेत अभिजीत केळकर व सहका-यांनी यांनी नृत्याविष्कार सादर केला.
नटरंग, लयभारी चित्रपटातील मराठी गाण्यांबरोबरच सिंघम सारख्या हिंदी चित्रपटातील गाण्यांवर प्रजाक्ता माळी, संस्कृती बालगुडे, केतकी पालव, सोनाली कुलकर्णी यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारांना आणि आदर्श शिंदे, राहुल सक्सेना अनिरूद्ध जोशी आणि पियांका बर्वे यांच्या आवाजाला रसिकांनी जल्लोषात दाद दिली. कलर्स मराठी वाहिनी ही यंदाच्या पुणे फेस्टीव्हलची मुख्य प्रायोजक आहे.