पुणे, दि. 01 : चाकण व तळेगाव परिसरातील उद्योगांचे वीजविषयक प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील व ग्राहकसेवेत कोणताही तडजोड होणार नाही, अशी ग्वाही महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिली.
चाकण एमआयडीसी येथे शनिवारी (दि. 29) औद्योगिक ग्राहक संपर्क अभियानात चाकण व तळेगावमधील उद्योजकांसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्री. शिवहरी हलन यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे म्हणाले, की औद्योगिक ग्राहक हे महावितरणसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्यांच्याशी संवाद व संपर्क साधून ग्राहकसेवा व वीजविषयक प्रश्नांचे स्वरुप जाणून घेण्यासाठी औद्योगिक ग्राहक संपर्क अभियान सुरु केलेले आहे. त्यानुसार पुणे प्रादेशिक विभागातील सर्वच औद्योगिक क्षेत्रात जाऊन उद्योजकांशी संवाद साधण्यात येत आहे.
चाकण व तळेगावमधील उद्योगांच्या वीजपुरवठ्यामध्ये महापारेषणच्या उपकेंद्गातील ब्रेकर्स व रिलेमुळे व्यत्यय येत असल्याची बाब समोर आली. महापारेषणच्या संबंधितांशी चर्चा करून हा प्रश्न निकाली काढला जाईल, असे श्री. ताकसांडे यांनी सांगितले. चाकण व तळेगावमध्ये मिक्स फिडरचे सेपरेशन करणे, पर्यायी वीजपुरवठ्यासाठी आंतरजोडणी वीजवाहिन्या टाकणे, आवश्यकतेनुसार 35 ठिकाणी नवीन रिंग मेन युनिट किंवा एबी स्विच टाकणे आदी तांत्रिक दुरस्तींना जागेवरच मंजुरी देण्यात आली व विनाविलंब कामे सुरु करून येत्या 15 दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. उद्योगांच्या वीजपुरवठ्यातील अडथळ्यांची तांत्रिक कारणे शोधून काढावीत. चाकण व तळेगाव येथील औद्योगिक क्षेत्रासाठी 24×7 सुरु राहणारा स्वतंत्र नियंत्रण कक्ष लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी सांगितले. उद्योगांच्या ग्राहकसेवेत हयगय झाल्यास किंवा ग्राहकसेवेच्या कामामध्ये उदासिनता दिसल्यास महावितरणच्या संबंधित अभियंत्यांविरुद्ध कारवाईचा इशारा त्यांनी दिला.
या बैठकीत विविध उद्योगांचे संचालक व प्रतिनिधी यांनी वीजविषयक प्रश्न व अपेक्षांची माहिती दिली. पूर्वीच्या तुलनेत महावितरणचा वीजपुरवठा व सेवेत मोठी सुधारणा झाल्याचेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले. प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे व मुख्य अभियंता श्री. शिंदे यांनी वीजप्रश्नांचा आढावा घेत त्याच्या निराकरण संबंधी महावितरणच्या अभियंत्यांना सूचना दिल्या. तसेच आवश्यक साहित्यही तात्काळ उपलब्ध करून दिले.
या बैठकीला अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार, श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. प्रल्हाद खडके, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल, उद्योजक श्री. विनोद जैन आदींसह ला’रिअल, कोरस इंडिया, फिलिप्स, एन्डूरंस, मिंडा इंडस्ट्रीज, महिंद्रा आदी कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधींसह महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. राहुल डेरे, इतर अधिकारी व सर्व शाखा अभियंता उपस्थित होते.