पुणे:
ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर, तुमचे आयुष्य चांगले जाईल. तुमच्या सगळ्या व्याधी दुर होतील. गीतेचे वाचन करण्यापेक्षा बायबलचे वाचन करा.’ असे म्हणत घरात घुसून हातामध्ये बायबल ठेवत ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याबाबत जबरदस्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या धर्म प्रचारकांनी मुर्ती पुजा करु नका असे सांगत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास विडी कामगार वसाहतीमध्ये घडला.
याप्रकरणी प्रेरणा दिलीप भंडारी (वय २५, रा. शनी मंदिराशेजारी, विडी कामगार वसाहत, चंदननगर) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रिना रामदास मनसा (वय ५०, रा. गंगापुरम सोसायटी, दोराबजी मॉल समोर, विमाननगर), एलिसा रमेश आल्फ्रेड् (वय ७०, रा. साईकृपा सोसायटी, वडगाव शेरी), रिबेका अनुराज सिगामनी (वय ४८, रा. बालाजी उद्यमनगर, वडगाव शेरी), शारदा जगदिश सोदे (रा. ओम गंगोत्री सोसायटी, गुरुद्वारा गल्ली, वडगाव शेरी), प्रिया राजु सिंगामनी (वय ४५, रा. सुनितानगर, संकल्प सोसायटी, वडगाव शेरी) यांच्याविरुद्ध भादवि १४१, १४३, ४५२, २९५-अ, २९८ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चंदननगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांची आई व लहान भावासमवेत राहतात. त्यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्या एका खासगी कंपनीमध्ये सिनिअर एक्झकेटीव्ह म्हणून काम करतात. शनिवारी त्या तब्येत बरी नसल्याने कामावर गेल्या नव्हत्या. सकाळी साधारण साडेदहाच्या सुमारास दोन महिला घराबाहेर आल्या होत्या. त्यांनी फिर्यादीला आणि त्यांच्या आईला बोलण्याच्या बहाण्याने बाहेर बोलावले. त्यांनी त्यांची नावे रिना व एलिस असल्याचे सांगितले. त्यांच्याकडील हस्त पत्रक दाखवत आजकाल मुले मोठ्या प्रमाणावर मोबाईल वापरत आहेत, त्याचे दुष्परीणाम त्यांच्या मनावर होत असल्याचे सांगितले. त्यांनी ‘हस्त पत्रकामध्ये ख्रिस्तीधर्माबद्दल माहिती दिलेली असून त्यावरील कोड स्कॅन केल्यास ख्रिस्तीधर्माबद्दल माहिती मिळेल असे सांगितले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या आईला ख्रिस्तीधर्माबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली. त्यानंतर या दोघींनी घरात येऊ का अशी विचारणा करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने त्यांना घराबाहेर थांबूनच माहिती द्या असे सुचवले. त्यांचे काहीही न ऐकता या दोघी घरात घुसल्या. त्यांच्यासोबत असलेल्या रिबेका, शारदा, प्रिया या तिघी बाहेर उभ्या राहिल्या. रिना आणि एलिस यांनी ‘ख्रिस्ती धर्म स्विकारला तर, तुमचे आयुष्य चांगले जाईल. तुमच्या सगळ्या व्याधी दुर होतील. गीतेचे वाचन करण्यापेक्षा बायबलचे वाचन करा.’ असे म्हणत फिर्यादीच्या हातामध्ये बायबल ग्रंथ ठेवला. तसेच, ‘मुर्ती पुजा करु नका’ असे त्या म्हणाल्या. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या आईला ख्रिस्ती धर्म स्वीकराण्याबाबत जबरदस्ती केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. हा गोंधळ पाहून काही वेळातच वस्तीमधील लोक जमा झाले. या सर्व धर्म प्रचारकांना घेऊन नागरिकांनी चंदननगर पोलीस ठाणे गाठले. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केले. या पाच जणी फिर्यादी यांच्या व्यतिरिक्त आणखी देखील नागरिकांच्या घरी गेल्या होत्या. त्यांना देखील ख्रिस्ती धर्माबाबत माहिती देऊन धर्म परिवर्तन करण्याबाबत जबरदस्ती करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याबाबत वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण म्हणाले, की जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यास सांगितल्याप्रकरणी तसेच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमचा पुढील तपास सुरू आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सिद्धनाथ खांडेकर करीत आहेत.