नवी दिल्ली- काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे 63 वर्ष वय होते. आज (ता.22) सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, दिल्लीतल्या प्रायमस रुग्णालयात त्यांचे निधन झाले. ते कामानिमित्त दिल्लीला गेले असता, त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
कामत हे 1984 पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. पाचवेळा ते ईशान्य मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये 2009 ते 2011 या काळात केंद्रिय गृहराज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.
दरम्यान, काँग्रेसमधील अभ्यासू नेते म्हणून ते ओळखले जायचे. काँग्रेसमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पडत संघटनकौशल्य सिद्ध केले होते. त्यांच्या निधनाने मुंबई आणि महाराष्ट्र काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.