मुंबई : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली वाडा येथील स्टील उद्योजकांच्या दहा सदस्यांच्या एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेऊन वाडा, जि. पालघर येथील स्टील उद्योगांना स्वस्त दराने वीज देण्याची मागणी केली.
विदर्भ व मराठवाड्यात उद्योगांना चालना देण्यासाठी तेथील उद्योगांना लागणाऱ्या विजेच्या दरात कपात सुचविण्यासाठी एक समिती गठित करण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगत या समितीची कार्यकक्षा वाढवून उर्वरित महाराष्ट्रातील मागासभागातील उद्योगांना देखील स्वस्त दराने वीज देण्याबाबत विचार करावा, अशी विनंती सुभाष देसाई यांनी राज्यपालांकडे केली.
पालघर जिल्ह्यातील वाडा या आदिवासी भागात स्टीलचे अनेक उद्योग असून त्यातून एक लाख लोकांना रोजगार मिळत आहे. या उद्योगातून सरकारला 350 कोटी रूपयांचा विक्रीकर मिळत आहे. हा उद्योग बहुतांश विजेवर चालतो. मात्र तेथे प्रति यूनिट विजेचा भाव विदर्भ व मराठवाड्याच्या तुलनेत अधिक आहे. त्याउलट दमण, सिल्व्हासा व गुजरात येथे विजेचा प्रति यूनिट भाव अतिशय कमी आहेत. या पार्श्वभूमीवर वाडा येथील उद्योगांना विजेच्या भावात सूट न मिळाल्यास सर्व उद्योग बंद पडतील, अशी भीती वाडा इंडक्शन फर्नेस असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश मेहता यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन राज्यपालांनी शिष्टमंडळाला दिले.

