सातारा -(जि.मा.का): “This is all india radio… यह आकाशवाणी है..! हे आकाशवाणी आहे…” भारतातील सर्व भाषा व बोली भाषेतून श्रोत्यांशी संवाद साधणाऱ्या आणि खास करुन ग्रामीण भागातील श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आपल्या आकाशवाणीला 88 वर्षे उद्या पूर्ण होत आहेत. याच वर्धापन दिनानिमित्त उद्या गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता श्री. छ. शाहू कला मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संगीत, लोकसंगीत, समुहगीत यांच्यासह ‘काचेपलीकडील वास्तव’ हा आकाशवाणी उद्घोषकांतर्फे सादर केला जाणारा कार्यक्रम खास आकर्षण असेल, अशी माहिती आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी गोविंद मोकाशी यांनी दिली.
23 जुलै 1927 ला मुंबई आणि कलकत्ता येथे प्रसारण सेवेला सुरुवात झाली. 1936 मध्ये भारतीय प्रसारण सेवेचे ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण झाले आणि 1957 मध्ये आकाशवाणी असे नाव करण्यात आले. 23 नोव्हेंबर 1991 ला सातारा केंद्रची सुरुवात करण्यात आली. आकाशवाणीच्या 88 व्या वर्धापनदिनानिमित्त पश्चिम क्षेत्राचे अतिरिक्त महासंचालक एम.एस. थॉमस यांनी उद्या गुरुवारी राज्यातील सर्वच आकाशवाणी केंद्रातर्फे विविध कार्यक्रमांची मेजवानी श्रोत्यांसाठी ठेवली आहे.
गेल्या 88 वर्षांपासून आकाशवाणी बहुजन हिताय बहुजन सुखाय या घोषवाक्याप्रमाणे सर्वांच्या जीवनाशी निगडीत झालेली आहे. चारशे हून अधिक केंद्रातून अगदी कारगीलपासून कन्याकुमारीपर्यंत आणि भूजपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत 99 टक्के भारतीय भूभागातील जनसामान्यांचे ज्ञानरंजनातून मनोरंजन करीत आहे. आपत्तकालीन काळात मदत कार्यालयात अग्रभागी असणारी आकाशवाणी जागातील मोठी सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे. भारतातील सर्व भाषा आणि बोली भाषेतून श्रोत्यांशी संवाद साधणाऱ्या आकाशवाणीला 88 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आकाशवाणीतर्फे विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यामध्ये सूरवर्धिनी संगीत विद्यालयातर्फे सूरमयी सांज, विजयकुमार गायकवाड आणि सहकारी प्रस्तुत लोकसंगीत, कन्या शाळेतर्फे समुहगीत आणि काचेपलीकडील वास्तव हा कार्यक्रम आकाशवाणीचे उद्घोषक सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता श्री. छ. शाहू कला मंदिर येथे होणार आहे. हा कार्यक्रम विनामुल्य असून जास्तीत जास्त सातारकरांनी याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन श्री. मोकाशी यांनी केले आहे.