खार पोलिसांनी आपल्याला अटक केल्यानंतर रात्रभर पाणीही दिले नाही. पोलिसांनी आपल्याला अत्यंत हिन वागणूक दिली, असा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यावर आज मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पोलिस स्टेशनमध्ये राणा दाम्पत्याचा चहा पितानाच व्हिडिओच संजय पांडे यांनी ट्विट केला आहे.
आपण मागासवर्गीय असल्यामुळेच मुंबई पोलिसांनी आपल्याला हीन वागणूक दिली. रात्रभर खार पोलिस स्टेशनमध्ये असताना तेथे महिला पोलिस कर्मचाऱ्याला आपण पाणी देण्याची विनंती केली होती. मात्र, आपल्याला साधे पाणीही देण्यात आले नाही, असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. तसेच, याप्रकरणी त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडेही तक्रार केली होती. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या व देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई पोलिसांवर जोरदार टीका केली. दोघांच्याही टीकेचा रोख हा संजय पांडेंवरच होता. अखेर आज नवनीत राणा यांचा पोलिस स्टेशनमध्ये चहा पितानाच व्हिडिओच संजय पांडे यांनी ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच, आणखी काही बोलायची गरज आहे का, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून मुंबई पोलिस आणि तुरुंग प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. मी दलित असल्याने पिण्याच्या पाण्यासारखे मूलभूत मानवी हक्क मला नाकारण्यात आले. तसेच रात्री बाथरूम वापरायचे असताना पोलिस कर्मचाऱ्यांनी माझ्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. मला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करण्यात आली. मला सांगण्यात आले की आम्ही खालच्या जातीतील लोकांना आमचे बाथरूम वापरू देत नाही, असे गंभीर आरोप नवनीत राणा यांनी पोलिसांवर केले आहेत. या पत्राची लोकसभा सचिवालयाने दखल घेतली असून यासंदर्भातील अहवाल 24 तासांत सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.