आमचाही असाच एक दहिसरचा ग्रुप आहे पण आम्ही कुणीही एकमेकांचे नातेवाईक नसून स्नेही आहोत. आमच्यामधले असलेल्या स्नेहबंधाचे नाते तयार झाले आहे. त्याची सुरुवात सिद्धेश कामत यांच्या तबला कार्यशाळेने झाली. आमची मुलं त्यांच्याकडे तबला शिकतात. कार्याक्रमाच्या निमित्ताने आम्ही पालक एकमेकांना भेटतो. त्यातून मग वर्षातून किमान दोन वेळा तरी कौटुंबिक सांगितिक कार्यक्रम होऊ लागले. त्यात मुलांबरोबर पालकांच्या सुप्त गुणांनाही वाव दिला जातो. सिद्धेश सरांनी आमच्या समोर तबला कार्यशाळेची संकल्पना मांडली.
या नवीन उपक्रमाची सुरुवात आश्रमशाळेच्या कार्यशाळेपासून झाली. त्यानंतर मग आमच्याच ग्रुपमधल्या सौ. कांचन वहिनींच्या घरी केळवे-माहिमला, सौ. नीता वहिनींच्या फार्म हाऊसवर बोर्लीला, श्री. पै. मामांकडे केळवे-माहिमला तबला कार्यशाळेचे आयोजन केले. साधारण 10 ते 16 वयोगटातील 15-16 मुलं आणि 4-5 पालक असे आम्ही एकत्र जमतो. इथे कुठल्याही प्रकारच्या जाती-धर्मांचे बंधन नाही, येईल त्याला आमच्यात सामावून घेतो. खेळीमेळीच्या या कार्यक्रमात सगळे उत्साहाने सहभागी होतात. मुलांना कुठल्याही क्लासला न जाता व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे मिळतात. एकत्र कुटुंब पद्धती, गावातल्या त्या घरामुळे आजोळ म्हणजे काय याचा अनुभव मुलांना मिळतो. चुलीवरचा स्वयंपाक, पंक्तीपद्धतीने जेवण, अंगणातल्या गप्पा-गोष्टी या सर्वांचा सगळे जण मनसोक्त आस्वाद घेतात. कुणीही कुणाचे नातेवाईक नसलो तरी एक स्नेह कुटुंबाचा आनंद आम्ही सगळेच घेतो. पहाटे उठून रियाझ करणे, आपापली कामे करणे, छोटया-मोठया कामांना मदत करणे या सगळ्यामुळे थोड्याप्रमाणात का होईना पूर्वीच्या काळच्या गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणाचा मुलांना अनुभव मिळतो. वेग-वेगळ्या विषयांवर चर्चा करणे. त्यांच्या तबला विषयावर वाद-विवाद स्पर्धा, त्यातून त्या मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. आम्हा पालकांना सुद्धा एकत्र आल्यामुळे खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात. एकमेकांचे रिती-रिवाज, नवीन काही पदार्थ, राजकारण, साहित्य, कला विषयांवरच्या चर्चेत विचारांची देवाण-घेवाण होते. आमच्यापैकी कुणी व्यावसायिक आहेत तर ते एकमेकांना कसे उपयोगी पडू शकतात यावरही चर्चा होते.
मुलांना आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक कलेचीही माहिती असावी, त्यांना गोडी निर्माण व्हावी या हेतूने नवीन उपक्रम राबवणार आहोत. कौटुंबिक, सांगितिक कार्यक्रमाबरोबर कविता वाचनाचा कार्यक्रम, पुण्याच्या कार्यशाळेबरोबर सिंहगड, शनिवार वाडा तसेच केळकर म्युझियम यांचीही सहल असेल. केळवे-माहिमला आदिवासी आश्रमशाळेतील मुलांसाठी कार्यक्रम, त्यांच्या ग्रंथालयासाठी पुस्तके आणि मुलांसाठी अभ्यासाचे साहित्य. अशा या छोट्या-मोठ्या उपक्रमांतून समाजकार्य करण्याचाही प्रयत्न असणार आहे.
मुलांचे तबला शिक्षण पूर्ण झाले तरी आमच्यातील स्नेहबंध हे असेच राहणार आहेत. आणि ह्या स्नेहबंधातूनच नव-नवीन उपक्रम आणि सामाजिक कार्य करण्याचा आमच्या सगळ्यांचाच प्रयत्न असेल. असे हे आमचे स्नेहबंधातून निर्माण झालेले स्नेह-कुटुंबाचे ऋणानुबंध आहेत.
– पुर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068