महावितरणने राज्यातील सुमारे 2 कोटी 50 लाख वीजग्राहकांना वीजविषयक ग्राहकसेवा देण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. वीजग्राहकांच्या आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत महावितरणच्या ग्राहकसेवा पुढीलप्रमाणे.
1) लघुदाब ग्राहकांसाठी मुदतीत व मुदतीनंतरही ऑनलाईन पेमेंटची सोय- महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in या वेबसाईटद्वारे सोय उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर जून 2016 मध्ये वीजग्राहकांसाठी मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली. या अॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. याआधी वीजदेयके भरण्याची मुदत संपल्यानंतर संबंधीत देयक ऑनलाईन भरणा करणे शक्य नव्हते. आता मुदतीनंतरही ऑनलाईन देयके भरणा करणे शक्य झाले आहे. पुणे परिमंडलात सद्यस्थितीत सरासरी 7 लाख 35 हजार वीजग्राहक दरमहा ऑनलाईन पेमेंट करीत आहेत.
2) 24×7 टोल फ्री कॉल सेंटर- शहरी व ग्रामीण क्षेत्रातील वीजग्राहकांसाठी 24×7 सुरु असणारे टोल फ्री कॉल सेंटर कार्यरत आहे. वीजसेवेबाबत कोणतीही तक्रार करण्यासाठी दूरध्वनी व मोबाईलधारक वीजग्राहकांसाठी 1912 किंवा 18002003435 किंवा 18002333435 हे तीन टोलफ्री क्रमांक उपलब्ध करून दिलेले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारीसह सर्व प्रकारच्या तक्रारी या टोल फ्री क्रमांकावर दाखल करू शकतात. तक्रारदार ग्राहकांना तक्रार क्रमांक देण्यात येतो तसेच तक्रारीचे निवारण करण्याची कार्यवाही लगेचच सुरु होते.
3) गो-ग्रीनमध्ये ई-बीलाचा पर्याय – पर्यावरणाला पुरक अशा गो-ग्रीन संकल्पनेतून महावितरणने लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना कागदाऐवजी इमेलद्वारे वीजदेयके मिळविण्याचा पर्याय दिलेला आहे. यासाठी ग्राहकांना दरमहा देयकात तीन रुपये सूट दिली जात आहे. गो-ग्रीन सेवेतून कागदाऐवजी फक्त इमेलद्वारे वीजदेयके मिळविण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर किंवा महावितरणच्या http://wss.mahadiscom.in/wss/wss या वेब सेल्फ सर्व्हीसच्या पेजवर जाऊन वीजग्राहकांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल. यात आवश्यक माहिती भरल्यानंतर वीजग्राहकांना महावितरणच्या ऑनलाईनद्वारे देण्यात येणार्या सर्व सुविधा उपलब्ध होतील.
4) ईमेलद्वारे ई-बील उपलब्ध – महावितरणकडून लघुदाब वीजग्राहकांना त्यांच्या इमेलवर संबंधीत वीजबील दरमहा उपलब्ध करून देण्यात येत आहे. छापील कागदाच्या देयकासह दरमहा इमेलद्वारे वीजदेयके मिळविण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर किंवा महावितरणच्या http://wss.mahadiscom.in/wss/wss या वेब सेल्फ सर्व्हीसच्या पेजवर जाऊन वीजग्राहकांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ई-बील ऑप्शनमध्ये लघुदाब वीजग्राहकांनी ग्राहक क्रमांक, प्रोसेसींग सायकल, बिलींग युनिट आणि ई-बील प्राप्त करण्यासाठी इमेल अॅड्रेस याची माहिती भरल्यानंतर ई-बील उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सेवेसोबतच दरमहा छापील वीजदेयके देण्याची प्रक्रिया कायम राहणार आहे.
5) एसएमएसद्वारे वीजबीलाची व इतर माहिती – वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी झाल्यानंतर वीजबिलाचा तपशील, वीजपुरवठा बंद असल्याचा कालावधी किंवा देखभाल व दुरुस्तीच्या कालावधीची माहिती महावितरणकडून ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येत आहे. यासाठी वीजग्राहकांनी त्यांच्या ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. महावितरणकडून वीजग्राहकांना मोबाईल क्रमांक किंवा इमेलची नोंदणी करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 या क्रमांकावर MREG (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होणार आहे. नोंदणी केलेल्या वीजग्राहकांना महावितरणकडून वीजबिलासह इतर माहिती एसएमएसद्वारे सुरु करण्यात येत आहे. याशिवाय कॉल सेंटरमध्ये संपर्क साधून, मोबाईल अॅप किंवा इंटरनेटवरूनही मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. सोबतच वीजबिलाच्या एसएमएसद्वारेही वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध झालेली आहे.
6) वीजग्राहकांसाठी मोबाईल अॅप – महावितरणने वीजग्राहकांसाठी तयार केलेले मोबाईल अॅप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून ‘अॅन्ड्राईड’, ‘विन्डोज’ व ‘आयओएस’ ऑपरेटींग सिस्टीमच्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड होईल अशी सुविधा आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटसह गुगल प्ले-स्टोअर, अॅपल अॅप स्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड करण्याची सोय आहे.
वीजग्राहकांसाठी असलेल्या मोबाईल अॅपमधून उच्च व लघुदाब (एलटी व एचटी) वीजजोडणीची मागणी करता येणे शक्य झाले आहे. चालू व मागील देयके पाहणे आणि त्याचा भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळणार आहे. वीजसेवेबाबत टोल फ्री क्रमांकावर संपर्काची व तक्रारी करण्याची सोय आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांना इतर सेवांसाठी मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीची नोंदणी किंवा ते अद्यायावत करण्याची सोय आहे. मीटर रिडींग न घेतलेल्या वीजजोडण्यांच्या ग्राहकांना देयके तयार करण्यापूर्वी एसएमएसद्वारे लिंक पाठविण्यात येणार असून संबंधीत ग्राहकांना त्यांच्या मोबाईलमधील अॅपद्वारे मीटर रिडींग घेऊन ते महावितरणकडे पाठविण्याची सोय होणार आहे. सोबतच ब्रेकडाऊन किंवा देखभाल व दुरुस्तीमुळे ज्या वाहिनीवरील वीजपुरवठा खंडित होईल तो पूर्ववत होण्याचा कालावधी वीजग्राहकांना एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. यासह महावितरणच्या सेवेबाबत वीजग्राहकांना फिडबॅक देण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
8) नवीन वीजजोडणीसाठी ‘ऑनलाईन’ पर्याय – कृषी, घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक अशा सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना आता नवीन वीजजोडणीच्या अर्जासाठी मोबाईल अॅप किंवा www.mahadiscom.in या वेबसाईटद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध झाली आहे. ऑनलाईन अर्ज करणार्या ग्राहकांना संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल पत्ता देणे बंधनकारक आहे. कंपनीचे कॉलसेंटर या ऑनलाईन अर्जदार ग्राहकाशी संपर्क साधून त्यांनी दिलेल्या माहितीची खात्री करून घेईल आणि संबंधीत कार्यालयाकडे हा तपशील पाठवतात. त्यानंतर शहरी भागात 07 दिवसांत व ग्रामीण भागात 10 दिवसांत संबंधीत उपविभागीय कार्यालयाचे कर्मचारी ग्राहकाशी संपर्क साधतात. वीजजोडणीच्या जागेची पाहणी करून नवीन जोडणीच्या ए-1 फॉर्मवर संबंधीत ग्राहकाची सही व संबंधीत कागदपत्रे घेतली जाते व त्यानंतर संबंधीत उपविभागीय कार्यालयाकडून नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही सुरु होते.
9) नवीन वीजजोडणीची अंतर्गत प्रक्रिया आता ‘ऑनलाईन’ – नवीन वीजजोडणी, नवीन किंवा वाढीव वीजभार मंजुरी आदींबाबत ग्राहकाने महावितरणच्या कार्यालयात जाऊन अर्ज दिल्यानंतर किंवा इंटरनेटवरील संकेतस्थळावरून ‘ऑनलाईन’ अर्ज दाखल केल्यानंतर त्यापुढे होणारी महावितरण अंतर्गत सर्व प्रक्रिया ‘ऑनलाईन’ करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज केल्यापासून ते वीजजोडणी मिळेपर्यंतची महावितरण अंतर्गत सर्व प्रक्रिया ‘ऑनलाईन’ व पारदर्शक होत आहे.
10) महावितरणचा विशेष मदत कक्ष – महावितरणच्या ग्राहकांना नवीन वीजजोडणी तसेच ग्राहक नावात बदल करण्याच्या प्रक्रियेत तक्रार असल्यास ती तातडीने सोडविली जावी यासाठी महावितरणच्या मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात विशेष मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. महावितरणच्या नवीन वीजग्राहकांना वीजजोडणी घेताना आणि ग्राहक नावात बदल करताना विविध कारणांमुळे अडचणी आल्यास किंवा काही तक्रार असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी हा विशेष मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षाला संपर्क साधण्यासाठी 022-26478989 व 022-26478899 हे दोन दूरध्वनी क्रमांक कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत.
11) नवीन वीजजोडणीच्या प्रक्रियेत एजंटांना थारा देऊ नये – महावितरणमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार मंजुरी, नावात बदल आदींबाबतची प्रक्रिया सुटसुटीत व पारदर्शक करण्यात आली असून या कामांसाठी कोणत्याही स्वयंघोषित एजंटांना वीजग्राहकांनी थारा देऊ नये.
महावितरणने वेबसाईट किंवा मोबाईल अॅपद्वारे नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय वेबसाईटवर नवीन वीजजोडणीचा एक पानी अर्ज उपलब्ध आहे व लागणारी आवश्यक कागदपत्रे व महत्वाचे म्हणजे वीजजोडणीसाठी लागणाऱ्या शुल्काची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. ऑनलॉईन किंवा अर्ज भरून दाखल केलेल्या नवीन वीजजोडणीची महावितरण अंतर्गत प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाईन करण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज दाखल केल्यानंतर त्याची स्थिती ही ग्राहकांना स्वतः वेबसाईटवर पाहता येते किंवा महावितरण कार्यालयातून त्याबाबत माहिती घेता येते.
वीजग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी महावितरण नेहमीच तत्पर असते. नवीन वीजजोडणी, नावांत बदल किंवा वाढीव वीजभार मंजुरी आदींची प्रक्रिया महावितरणने अतिशय सुलभ व पारदर्शक केलेली आहे. त्यामुळे ग्राहकांनी स्वतः कार्यालयात येऊन त्याचा लाभ घ्यावा. आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर प्रशासकीय दिरंगाई होत असल्याची तक्रार असल्यास 1800-200-3435 व 1800-233-3435 किंवा 1912 या तीन टोल फ्री क्रमांकांवर 24(7 संपर्क साधावा. याशिवाय मुंबई येथील मुख्यालयात विशेष मदत कक्ष सुरु करण्यात आला असून 022-26478989 किंवा 022-26478899 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
वीजयंत्रणेत बिघाड असल्यास किंवा दोष असल्यास त्याचा परिणाम मीटरमधील वीजवापराच्या रिडींगवर होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी वीजमीटरपुढील सर्व वायरिंग सुस्थितीत व दोषविरहित ठेवण्यासाठी नियमित तपासणी करून घेणे मात्र अतिशय आवश्यक आहे.
हे सर्व असताना वीजग्राहकांना कोणत्याही स्वयंघोषित एजंटांकडे जाण्याची कुठलीही आवश्यकता नाही. हे स्वयंघोषित एजंट स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वीजग्राहकांची फसवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करतात. त्यामुळे वीजग्राहकांनी अशा स्वयंघोषित एजंटांना थारा न देता महावितरणच्या सेवांचा थेट लाभ घ्यावा.
निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, पुणे