मुंबई : पुण्यातील बहुचर्चित शिवसृष्टी साकारण्याचा अंतिम मार्ग मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केला. चांदणी चौकाजवळील जैववैविध्य आरक्षण उद्यानाच्या (बीडीपी) जागेतच तब्बल 50 एकर जागेत शिवसृष्टी करण्याचा आपला निर्णय स्पष्ट केला . त्यासाठी आवश्यक तेवढा पुरेसा निधी विनाविलंब देण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली,यामुळे 11 फेब्रुवारीपासून मेट्रोचे काम बंद पाडण्याचे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांनी केली.
वनाज -रामवाडी मेट्रो मार्गावर पौड रस्त्यावर जुन्या कचरा डेपोच्या जागेत शिवसृष्टी उभारण्याचा ठराव महापालिकेन या पूर्वी केला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावाही सुरू आहे. मात्र, मेट्रो मार्गावर या जागेवर मेट्रोचा डेपो उभारायचा असल्याचे महामेट्रोने म्हटले होते. शिवसृष्टी आणि त्या खाली भुयारी मेट्रोचा डेपो उभारावा, अशीही मागणी झाली होती . मात्र, अचानक शिवसृष्टी आणि मेट्रोचा डेपो हे दोन्ही एकाच ठिकाणी उभारणे शक्य नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितल्याचे समजले .
या पार्श्वभूमीवर बैठकीच्या अगोदरच चांदणी चौकातील बीडीपीच्या जागेत शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव मान्य करावा, यासाठी मोर्चेबांधणी झाली होती. आणि बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शिवसृष्टीसाठी लागणारी ‘बीडीपी’मधील जागा महापालिका संपादित करणार आहे. त्यासाठी मोबदल्याचे धोरण राज्य सरकार लवकरच जाहीर करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.