* युरोपातील विविध महोत्सवातील निवडक २० चित्रपट मोफत पाहण्याची पुणेकरांसाठी संधी !
* युरोपियन दिग्दर्शक घेणार अभिनय व दिग्दर्शनाची कार्यशाळा !
पुण्याच्या सांस्कृतिक श्रीमंतीत भर टाकणारा व गतवर्षी पुणेकर चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरलेलाफिल्म फेस्टिवल्स फ्रॉम युरोप यंदा २९ सप्टेंबर पासून सुरु होत आहे.विविध युरोपियन दूतावास व सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने आणि एमआयटी फिल्म स्कूल व राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्या सहयोगाने पुणे फिल्म फाऊंडेशनने आयोजित केलेला हा महोत्सव २ ऑक्टोबर
पर्यंत चालणार आहे. युरोपातील विविध प्रतिष्ठाप्राप्त चित्रमहोत्सवांमधील निवडक २० चित्रपटांचा विनामूल्य आस्वाद घेण्याची ही पुणेकरांसाठी संधी आहे.
गुरुवारी (ता.२९) सायंकाळी साडेचार वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रेक्षागृहात होणारया समारंभाने या महोत्सवाला आरंभ होईल. बेल्जियमच्या फिफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कार्यकारी संचालक आंद्रे स्युत्रिक हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असून पुणे फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल , एमआयटी फिल्म स्कूलचे कार्यकारी संचालक राहुल कराड व राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम हे या प्रसंगी उपस्थित असतील. याच प्रेक्षागृहात पुढे चार दिवस यामहोत्सवातील चित्रपट दाखवले जातील. सदर महोत्सव १८ वर्ष वयापुढील सर्वांना विनामूल्य खुला आहे, मात्र त्यासाठी आधी
नोंदणी करणे आवश्यक आहे. बर्लीन(जर्मनी),लोकार्नो(स्वित्झर्लंड),रोम(इटली),लिस्बन अँड इस्तोरील(पोर्तुगाल), (फिफा)बेल्जियम आदी युरोपातील प्रमुख
चित्रपट महोत्सवातील या निवडक चित्रपटांमध्ये कथाचित्रे,अनुबोधपट, लघुपट,असे वैविध्य अनुभवता येणार आहे.ऑल कॅटस
आर ग्रे या बेल्जियम चित्रपटाने चित्रप्रदर्शनास सुरुवात होईल .इटालियन दिग्दर्शक सिमोन मारयानी व स्वीस दिग्दर्शक लियोनेल बायर हे या महोत्सवा दरम्यान अभिनय व दिग्दर्शनाची कार्यशाळा घेणार आहेत. तीन युरोपियन दिग्दर्शकांचा प्रत्यक्ष सहभाग हे यंदाच्या महोत्सवाची खासियत आहे, असे आयोजनप्रमुख डॉ.जब्बार पटेल यांनी सांगितले.
महोत्सवाच्या मोफत प्रवेशिका पुणे फिल्म फाऊंडेशनच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत
(०२०)२४२६५१६१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.