पुणे -सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शबरीमला मंदिरात सुरक्षित दर्शन का घेऊ शकत नाही? असा सवाल पंतप्रधानांना करण्यासाठी आज सकाळी शिर्डीला जाण्यास निघालेल्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले . त्यांना सहकारनगर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शबरीमाला प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिर्डी येथे भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. शबरीमला मंदिरात अयप्पा स्वामींच्या भक्तांकडून महिलांना मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे तृप्ती देसाई यांनी गुरुवारी अहमदनगरच्या पोलीस अधिक्षकांना अर्ज लिहून पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी शिर्डीला जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ‘आम्ही सकाळी शिर्डीला जाण्यासाठी निघालो, तेव्हा पोलीस दलाने तेथे येऊन आम्हाला अडवले. एखाद्या गोष्टीचा निषेध करणे, हा आमचा संवैधानिक अधिकार आहे. हा पंतप्रधान मोदींच्याद्वारे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे’, असे मत तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शबरीमला मंदिरात सुरक्षित दर्शन का घेऊ शकत नाही?तसेच मंदिरात प्रवेश सुरू झाल्यानंतर महिला पत्रकारांना मारहाण करण्यात आली, त्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. भाजपने समानतेच्या विरोधात भूमिका घेतली आहे का? याचा जाब विचारण्यासाठी तुम्ही आज आमची भेट पंतप्रधान मोदींशी घालून द्या, अन्यथा गांधीगिरी मार्गाने भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या त्यांचा ताफा अडवतील, असे त्यांनी अहमदनगरच्या पोलीस अधिक्षकांना केलेल्या अर्जात लिहिले होते.