मुख्यमंत्र्यांनी आज केलं पोस्टरच अनावरण
बॉलिवूडमध्ये या वर्षांत तीन मोठ्या राजकीय नेत्यांवरील बायोपिक प्रदर्शित होत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर देखील जीवनपट येत आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय हा प्रमुख भूमिकेत असणार आहे.
गेल्याच आठवड्यात विवेकच्या नावाची अधिकृत घोषणा या चित्रपटासाठी करण्यात आली होती. विवेक हा गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधल्या झगमगत्या दुनियेपासून लांब आहे त्यामुळे विवेकची निवड या भूमिकेसाठी कशी झाली याचं कुतूहल अनेकांना होतं. त्यातूनच विवेकच्या नावाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर त्याच्या नावाची खिल्लीही उडवण्यात आली होती. मात्र नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’च्या पहिल्या वहिल्या पोस्टरमध्ये विवेक ओळखूही येत नाही. विवेकचा लूक हा मोदींच्या जवळपास जाणारा आहे असं म्हणत अनेकांनी कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. २३ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. उमंग कुमार या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. या महिन्यातच ‘पीएम नरेंद्र मोदी’ च्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. या चित्रपटात विवेकसोबतच ज्येष्ठ अभिनेते परेश रावलही मुख्य भूमिकेत आहेत.