पुणे: पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित तिसऱ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत मुलांच्या गटात अर्णव पापरकर याने 10 व 14 वर्षाखालील या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, नमिश हूड, मृणाल शेळके, पार्थ देवरूखकर, श्रावणी देशमुख, पूर्वा भुजबळ या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या पडलेल्या या स्पर्धेत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित अर्णव पापरकरने देव तुकारियाचा 7-1असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. याच गटाबरोबरच 14 वर्षाखालील गटात अव्वल मानांकित अर्णव पापरकरने तेराव्या मानांकित निशीथ रहाणेचा 4-1, 4-1 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. अर्णव हा न्यू इंडिया शाळेत चौथी इयत्तेत शिकत असून बाऊन्स टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
8वर्षाखालील मिश्र गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित नमिश हूड याने नीरज जोर्वेकरचा 7-0असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले. 10वर्षाखालील मुलींच्या गटात मृणाल शेळके हिने प्रिशा शिंदेचा 7-1असा पराभव करून विजेतेपद मिळवले. मृणाल एसपीएम पब्लिक शाळेत दुसरी इयत्तेत शिकत असून डेक्कन जिमखाना येथे प्रशिक्षक मदन गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
12वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या सामन्यात अव्वल मानांकित पार्थ देवरूखकरने आठव्या मानांकित अर्जुन कीर्तनेचा 4-0, 5-3असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. पार्थ हा डीईएस सेकंडरी शाळेत सहावी इयत्तेत शिकत आहे. याच मुलींच्या गटात चौथ्या मानांकित
श्रावणी देशमुखने सिमरन छेत्रीचा 5-3, 5-3असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले. 14वर्षाखालील मुलींच्या गटात दुसऱ्या मानांकित पूर्वा भुजबळने अव्वल मानांकित गौतमी खैरेला 4-0, 5-3असा पराभवाचा धक्का देत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: 8वर्षाखालील मिश्र गट: नमिश हूड(1)वि.वि.नीरज जोर्वेकर 7-0;
10वर्षाखालील मुले: अर्णव पापरकर(1)वि.वि.देव तुकारिया 7-1;
10वर्षाखालील मुली: मृणाल शेळके वि.वि.प्रिशा शिंदे 7-1;
12वर्षाखालील मुले:
पार्थ देवरूखकर(1)वि.वि.अर्जुन कीर्तने(8) 4-0, 5-3;
12वर्षाखालील मुली:
श्रावणी देशमुख(4)वि.वि.सिमरन छेत्री 5-3, 5-3;
14वर्षाखालील मुले:
अर्णव पापरकर(1)वि.वि.निशीथ रहाणे(13)4-1, 4-1;
14वर्षाखालील मुली:
पूर्वा भुजबळ(2)वि.वि.गौतमी खैरे(1)4-0, 5-3.