पुणे-संगनमत करून पावणेसहा कोटी रुपयांचे बेकायदा कर्ज मंजूर करत फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या तत्कालीन शाखाधिकाऱ्यासह एका कंपनीचा संचालक अशा एकूण चौघांना पुणे पोलिसांच्या आऱ्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
हरबन्ससिंग शिंगार्रंसग जब्बल (वय ७१, रा. प्राधिकरण, निगडी), बँकेचे शाखाधिकारी मिलिंद टण्णू, तत्कालीन कर्ज अधीक्षक वसंत धाकू भुवड (वय ६५) आणि हनुमंत संभाजी केमधरे (रा. वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सहकार विभागाकडून बँकेचे लेखापरीक्षण करण्यात आल्यानंतर बेकायदा कर्ज वाटप प्रकरण उजेडात आले आहे. विशेष लेखा परीक्षक चांगदेव पिंगळे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या शिवाजीनगर शाखेतून जब्बल ऑटो प्रा. लि. आणि याशिपिका इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपन्याना पावणेचार कोटी आणि दोन कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. या दोन्ही कंपन्यांचे मालक जब्बल आहेत. सहकार विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार या कर्ज प्रकरणाची चौकशी सुरु होती. सप्टेंबर २०१३ ते ऑक्टोबर २०१६ या कालावधीत हे कर्ज मंजूर करण्यात आले होते. लेखापरीक्षणात अनियमितता आढळून आली. या प्रकरणात तत्कालीन अधिकारी टण्णू आणि भुवड यांचा सहभाग असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर लेखापरीक्षक पिंगळे यांनी गेल्या महिन्यात २० मार्च रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या गुन्ह्याची व्याप्ती विचारात घेऊन तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने चौघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बुधवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली