ऊस तोड कामगारांच्या मूलभूत सोयी,मजुरी दर, पक्क्या साखर शाळांसाठी साखर आयुक्तांना निवेदन, आंदोलनाचा इशारा
पुणे :‘ऊसतोड कामगार संघटना’ यांच्या वतीने राज्यातील ऊस तोड कामगारांच्या मूलभूत सोयी,मजुरी दर, पक्क्या साखर शाळा इत्यादी मागण्यांसाठी साखर आयुक्त संभाजी कडू – पाटील यांना निवेदन देण्यात आले. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक दहिफळे, उपाध्यक्ष विठ्ठल बडे, सल्लागार सॉलिसिटर प्रसाद शिंदे, निवृत्तीनाथ आंबेकर, स्वाती मोराळे इत्यादी पदाधिकारी व संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
कारखान्याजवळ शौचालय असावे, रुग्णवाहिका, सकस आहार, शुद्ध पाणी, सर्पदंशावर उपचाराची लस, हातमोजे,हेल्मेट इत्यादी मूलभूत सुविधा मिळाव्यात, अपघाती मृत्यू झाल्यास २ महिन्यात नुकसान भरपाई मिळावी,अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
ऊसतोड कामगारांना कारखान्यांना ऊसतोडणी काळात किमान २ किलो साखर देण्याचे औदार्य दाखवावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.‘संघटनेच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करु आणि सर्व साखर कारखान्यांशी संपर्क साधू, असे आश्वासन सहकार आयुक्त संभाजी कडू – पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.