पुणे: विविध दैनिकांमध्ये मोठमोठ्या जाहिराती आणि बातम्या झळकविण्यात आल्या पण तरीही लोक आलेच नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (शनिवार) दुपारी दोन वाजताची न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात होणारी सभा गर्दी अभावी रद्द करावी लागली. मुख्यमंत्र्यांनी समन्वयाअभावी सभा रद्द केल्याचे ट्विट केले आहे.
भर दुपारची ,भर उन्हात ,जेवणाच्या वेळेत, वामकुक्षीच्या वेळेत सभा कशी होईल ? अशा प्रश्नांना उत्तर म्हणून काहींनी जाहिरातबाजी करवून घेतली होती … त्यावर कदाचित भरोसा ठेवून येथे मुख्यमंत्री पोहोचले खरे पण येथून मुख्यमंत्री भाषण न करताच पिंपरीला रवाना झाले.फडणवीस घटनास्थळी उपस्थित झाले तेव्हा व्यासपिठासमोरील खुर्च्या रिकाम्याच होत्या. समोर गर्दीच नसल्याने मुख्यमंत्री व्यासपीठावर गेलेच नाहीत. यावेळी व्यासपीठावर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट व भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना गर्दी अभावी सभा सोडून जावे लागले .