नागपूर, दि. 16 : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राखीव प्रवेश खासगी शिक्षण संस्थानी नाकारल्यास अशा शाळांवर कारवाई करणार असल्याचे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
खासगी शिक्षण संस्थेच्या शाळेत राखीव प्रवेश नाकारत असल्याचा प्रश्न सदस्य विजय उर्फ भाई गिरकर यांनी विचारला. त्याला उत्तर देताना श्री.तावडे म्हणाले, शिक्षणापासून कुणीही विद्यार्थी वंचित राहणार नाही. ज्या शाळा प्रवेश नाकारतील त्यांच्यावर शिक्षण हक्क कायद्यानुसार नोटीसा बजावण्यात येतील.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, हेमंत टकले, डॉ. नीलम गोऱ्हे आदींनी भाग घेतला.
विना अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रश्नावर
चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक – विनोद तावडे
राज्यातील कायम विना अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द काढण्याबाबत लवकरच बैठक घेवून चर्चा करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य श्री.विक्रम काळे यांनी हा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. श्री.तावडे म्हणाले, सन 2001 पूर्वीच्या काही कायम विना अनुदानित तत्वावरील विधी शाखेच्या महाविद्यालयात 1995-96 तर पारंपरिक महाविद्यालयांना1997-98 पासून कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता देण्यात आली आहे. राज्यामध्ये 2001 पूर्वी कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता दिलेल्या महाविद्यालयांची संख्या 63 असून त्यांना अनुदान देण्याची बाब तुर्त विचाराधीन नाही, असे श्री. तावडे म्हणाले.
राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयात प्राचार्यांची
रिक्त पदे भरण्याचे आदेश
राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयात प्राचार्यांची रिक्त पदे भरण्याबाबतचे आदेश दिल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य दत्तात्रय सावंत यांनी राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती प्रक्रिया सुरु करण्याबाबतचा प्रश्न विचारला होता. श्री.तावडे म्हणाले, अधिव्याख्यात्यांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शैक्षणिक काम पूर्ण करण्यासाठी तासिका तत्वावरील अभ्यागत अधिव्याख्याता नियुक्तीची तरतूद आहे. त्यानुसार तासिका तत्वावर अधिव्याख्याता नियुक्ती करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे. तसेच वित्त विभागाच्या प्रचलित धोरणानुसार पदांचा आढावा आणि आकृतीबंधास अंतिम मंजुरी मिळण्यासाठी कार्यवाही चालू आहे.