पुणे : जम्मू शहरानजीक नागरोटा येथील लष्करी छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पंढरपूरचे सुपुत्र मेजर कुणाल गोसावी यांचे पार्थिव सकाळी विमानतळावर आले. त्यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
त्यांनतर मेजर कुणाल गोसावी यांचे पार्थिव पुणे विमानतळ येथून हेलिकॉप्टरने पंढरपूरला रवाना करण्यात आले. तत्पूर्वी जिल्हा प्रशासनाच्यावतीने हवेलीच्या प्रांत ज्योती कदम, राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, तहसीलदार दशरथ काळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच संरक्षण विभाग, सैनिक कल्याण विभाग आणि विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहीद जवान गोसावी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.