पुणे-दहीहंडी उत्सव साजरा करताना ध्वनी प्रदुषण आणि वाहतूकीला अडथळा आणल्याने पोलिसांनी कार्यक्रम बंद करण्यास सांगितल्यानंतरही त्याला विरोध करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहकार नगर पोलिसांनी अभिनेता संतोष जुवेकर यांच्यासह अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष, स्टेज मालक, साऊंड मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष सिद्धांत प्रधान, स्टेज मालक राजीवसिंग ठाकूर, साऊंट माल विजय नरुटे अशी गुन्हा दाखल झालेल्या इतरांची नावे आहेत. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी फिर्याद दिली आहे.
अरण्येश्वर चौकात दहीहंडी उत्सव मंडळाने विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी स्टेजची रोडवर बांधणी करुन त्यावर कार्यक्रम आयोजित केला होता.मोठ्या क्षमतेची साऊंड सिस्टिम लावून जाणून बुजून ध्वनी प्रदुषण केले. तसेच रहदारीला अडथळा निर्माण केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी मंडळाच्या अध्यक्षांना कार्यक्रम बंद सांगितले. त्यांनी कार्यक्रम बंद करण्यास विरोध करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) व्ही.आर. पुराणीक करीत आहेत.
दरम्यान दहीहंडी मंडळाचा स्टेज पडल्याने पाच जण जखमी झाल्याची घटना बुधवार पेठ येथे घडली. याप्रकरणीही मंडळाच्या अध्यक्षासह चौघांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बुधवार पेठेतील विजय शिवाजी तरुण मंडळ येथे दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी स्टेज उभारण्यात आले होते. हे स्टेज रात्री पावणे दहाच्या सुमारास कोसळले. यावेळी स्टेजवर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला पारितोषीक घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. स्टेजवर प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाल्याने स्टेज मधोमध दबले जाऊन कोसळले. यामध्ये पाच नागरिक किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती फरासखाना पोलिसांनी दिली. याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष साईनाथ माने, उपाध्यक्ष शंकर भोसले, कार्याध्यक्ष नवनाथ परदेशी आणी स्टेज उभारणारा ठेकदार दत्तात्रय हेलकरी याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के यांनी दिली.