युरोपातील सर्वोच्च शिखर सर करणारा साई कवडे ठरणार सर्वात लहान आशियाई पुरुष
महाराष्ट्रातील रेकॉर्ड होल्डर गिर्यारोहक सागर नलावडे, तुषार पवार, भूषण वेताळ हेही एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार रशियातील सर्वोच्च शिखर सर
पुणे-जगातील सर्वोच्च शिखरांपैकी असलेले युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रूस सर करण्यासाठी महाराष्ट्रातील गिर्यारोहक निघाले असून एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली 360एक्सप्लोरर मार्फ़त या मोहिमेत अनेक विक्रम होणार आहेत.
हे शिखर सर करणारा 10 वर्षाचा साई कवडे हा आशिया खंडातील सर्वात लहान मुलगा ठरणार आहे.
याशिवाय लिंगाणा फक्त 16 मिनिटात सर करणारा विक्रमवीर कोल्हापूर येथील सागर नलावडे, पोलीस दलातील सातारा येथील तुषार पवार, किलीमांजारो सर करणारा पहिला स्टेट बँक कर्मचारी भूषण वेताळ हेही या मोहिमेअंतर्गत शिखर सर करणार आहेत. “मोहीम सह्याद्रीच्या लेकरांची” असे या मोहिमेला नाव दिले असून या मोहिमेचे नेत्तुत्व एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे हे करणार आहेत. आनंद बनसोडे यांनी 2014मधेच हे शिखर सर करून अनेक विक्रम केले होते.
रशिया मध्ये असलेले युरोप मधील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रूस या शिखराची उंची १८ हजार ५१० फुट असून काळा समुद्र व कॅस्पियन समुद्राच्या मध्ये हे शिखर वसलेलं आहे. जॉर्जिया देशाच्या बोर्डर पासून २० किमी अंतरावर माउंट एल्ब्रूस शिखर असून पृथ्वीवरील सर्वात उंच असेल्यापैकी एक असा हा निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे. याचे तापमान उणे 25 डिग्री पर्यंत जात असते. वर्षभर येणारी सततची सुरु असलेली मोठ-मोठी वादळे माउंट अल्ब्रूस चढाईतील मुख्य अडचण आहे.
10 वर्षाचा साई कवडे हा मूळचा पुणे येथील गिर्यारोहक हे शिखर सर करून सर्वात लहान आशियाई बनणार असून यांसाठी संपूर्ण महाराष्ट्राचे या मोहिमेकडे लक्ष लागून राहणार आहे. साई कवडे याने 360एक्सप्लोरर मार्फ़त वेगवेगळ्या मोहिमा केलेल्या आहेत व आम्हाला त्याच्या यशाबद्दल खूप विश्वास आहे असे त्याव्हे आई-वडील सुधीर व केतकी कवडे यांनी सांगितले.
आनंद बनसोडे यांनी स्थापन केलेल्या 360 एक्सप्लोरर मार्फत गेल्या काही वर्षात अनेक आंतरराष्ट्रीय मोहिमा आयोजित केल्या गेल्या आहेत. साहसी मोहिमांच्या आयोजनामध्ये 360 एक्सप्लोरर महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च स्थानी आहे.
“या मोहिमेद्वारे भरपूर विक्रम केले जाणार असून भारताचा सर्वोच्च तिरंगा यावर फडकवला जाणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती या शिखरावर नेहून सह्याद्रीची लेकरांची मोहीम हे नाव आम्ही साध्य करणार आहोत”
– सागर नलावडे
(लिंगाणा विक्रमविर गिर्यारोहक)
“या मोहिमेत ‘युनायटेड वी स्टँड’ असा संदेश देऊन जातीय सलोखा राहावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. भारतातील पहिला SBI कर्मचारी बनण्याचा मान मला मिळत आहे त्याबद्दल खूप आनंद होत आहे.
– भूषण वेताळ
(SBI चा प्रथम गिर्यारोहक)
“पोलीस दलातुन जास्तीत जास्त गिर्यारोहक बनावेत यासाठी महाराष्ट्रातील प्रथम पोलीस या आंतरराष्ट्रीय मोहिमेवर जात आहे. 15 ऑगस्ट रोजी भारतमातेला अभिवादन करणार आहे”
– तुषार पवार
( महाराष्ट्र पोलीस गिर्यारोहक)