मुंबई – तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमीने (टीएमजीए) आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी क्रिकेट मार्गदर्शन कॅम्प २०१९ चे वेळापत्रक जाहीर केले. याचा अभ्यासक्रम सचिन तेंडुलकर आणि मिडलसेक्स कंट्री क्रिकेट क्लब (एमसीसीसी) यांनी एकत्रितपणे सर्वोत्तम क्रिकेट प्रशिक्षण देण्याच्या हेतूने आखला आहे.
हे चार दिवसीय कॅम्प एमआयजी क्लब, बांद्रा पूर्व इथे २ ते ५ मे आणि डीवाय पाटील स्पोर्ट्स सेंचर, नवी मुंबई येथे ९ ते १२ मे या दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. एमसीसीसी प्रशिक्षिक आणि विनोद कांबळी यांच्यासह आंतरराष्ट्रीय खेळाडू तरुण क्रिकेट खेळाडूंना तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या जागतिक दर्जाच्या मार्गदर्शनाचा अनुभव घेण्याची असामान्य संधी देणार आहेत.
दोन्ही ठिकाणच्या कॅम्पसमधील सकाळचे सत्र ७ ते १२ वर्ष वयोगटातील उदयोनमुख क्रिकेट खेळाडूंसाठी, तर दुपारचे सत्र १३ ते १८ वर्ष वयोगटासाठी असेल. गेल्या वर्षीच्या कॅम्पमध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही त्यांची कामगिरी आणखी विकसित करण्यासाठी परत यंदाच्या कॅम्पमध्ये बोलावले जाणार आहे.
असामान्य क्षमता असलेल्या, मात्र कॅम्पचे शुल्क न परवडणाऱ्या खेळाडूंना मोफत प्रशिक्षण दिले जाईल.
सचिन तेंडुलकर म्हणाले, ‘गुणवान तरुण खेळाडूंची क्षमता पारखणे व तिचा विकास करणे हे आमचे ध्येय आहे. त्यांना त्यांचे क्रिकेट कौशल्य आणखी उंचावण्याची संधी देताना पाहाणं परिश्रमांची पावती मिळाल्यासारखं आहे. गेल्या वर्षी कॅम्पला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि आम्हाला मुले व त्यांच्या पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यामुळे आम्हाला या कॅम्पच्या पुढच्या आवृत्तीचे आयोजन करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले व मला खात्री आहे, की यंदाचे कॅम्प त्याहीपुढे जात यशस्वी होतील व त्यातून आणखी गुणवान क्रिकेट खेळाडू उदयास येतील.’
वितरण भागीदार बेसाइड स्पोर्ट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला टीएमजीए उन्हाळी क्रिकेट कॅम्प मुले व मुलींसाठी खुला आहे. मुलांच्या क्रिकेट क्षमतेबरोबरच खेळाच्या बॅटिंग, गोलंदाजी, अथलेटिक विकासासाठी क्षेत्ररक्षण, क्रीडा मानसिकता, धोरणात्मक विकास, तांत्रिक बदल इत्यादी सर्व पैलूंची माहिती करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
गेल्या वर्षी कॅम्पसला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने प्रत्येक कॅम्पची नोंदणी वेगाने पूर्ण झाली. त्यासाठी एकूण १२०० मुलांनी हजेरी लावली आणि त्यांनी या कॅम्पमधील एकंदरीत प्रशिक्षण अनुभवास ४.८/५ रेटिंग दिले.