पुणे, : नवीन वीजजोडण्याच्या कार्यवाहीमध्ये नियमांचे पालन न करता महावितरणचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी पर्वती विभाग अंतर्गत दोन अभियंत्यांना बुधवारी (दि. 18) निलंबित करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी, की वडगाव धायरी परिसरात वडगाव शाखेचे व सहाय्यक अभियंता श्री. व्यंकटगीर गीर व किरकिटवाडी शाखेचे सहाय्यक अभियंता श्री. अनिल इगवे यांनी महावितरणच्या आदेश, परिपत्रकांचे पालन न करता नवीन वीजजोडणी देण्याच्या कार्यवाहींमध्ये महावितरणचे आर्थिक नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.
याशिवाय संकुलांना देण्यात आलेल्या वीजजोडण्यांसाठी अधिकार नसताना तसेच सक्षम अधिकार्यांची परवानगी न घेता शाखा कार्यालय स्तरावर फर्म कोटेशन दिल्याचे दिसून आले आहे. या वीजजोडण्या देताना मुलभूत विद्युत यंत्रणा उभारणीची कामे केलेली नाहीत. तसेच काही नवीन वीजजोडण्या देण्याच्या प्रक्रियेत विद्युत भाराच्या प्रमाणात नियमानुसार सुरक्षा ठेव घेण्यात आलेली नाही किंवा कमी रक्कम घेण्यात आली आहे. याशिवाय नवीन वीजजोडणीसाठी सेवाजोडणी आकाराची रक्कमही घेतलेली नाही, असे निदर्शनात आले आहे. त्यामुळे श्री. व्यंकटगीर गीर व सहाय्यक अभियंता श्री. अनिल इरवे यांना महावितरणने निलंबित केले आहे.